राज्यात वज्रमूठ, युती; बाजार समिती निवडणुकांसाठी स्थानिक पातळीवर निर्णय!
By विजय मुंडे | Published: April 3, 2023 07:25 PM2023-04-03T19:25:39+5:302023-04-03T19:26:44+5:30
पाच बाजार समित्यांमध्ये ५३८ जणांचे अर्ज दाखल; पॅनलबाबत चर्चेचे गुऱ्हाळ
जालना : जिल्ह्यातील पाच बाजार समित्यांमधील ९० जागांसाठी ५३८ इच्छुकांनी अर्ज दाखल केले आहेत. अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली असली तरी युती-महाविकास आघाडीचा पुरस्कृत पॅनलबाबतचा निर्णय अंतिम झालेला नाही. त्यामुळे राज्याच्या राजकारणात महाविकास आघाडी, युती असली तरी बाजार समित्यांच्या निवडणुकांमध्ये मात्र स्थानिक पातळीवर निर्णय घेतले जाणार असल्याचे दिसत आहे.
राज्यातील सत्तांतराचे परिणाम जिल्ह्याच्या राजकारणावरही झाले आहेत. एकीकडे राज्यात महाविकास आघाडी विरुद्ध भाजप, शिवसेना (शिंदे गट) अशी स्थिती आहे. सत्ताधाऱ्यांच्या धोरणांवर टीका करण्यासाठी महाविकास आघाडीचे नेते वज्रमूठ बांधून सभा घेत आहेत. या सत्तांतराच्या पार्श्वभूमीवर बाजार समितीच्या निवडणुकांची रेलचेल सुरू आहे. पक्षपुरस्कृत पॅनल या निवडणुकीत उतरत असल्याने राजकीय दृष्ट्या या निवडणुकांनाही महत्त्व आले आहे. परंतु, राज्यात महाविकास आघाडी- युती असली तरी स्थानिक पातळीवर काही नेत्यांचे राजकीय वैर सर्वश्रुत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील पाचही बाजार समिती निवडणुकांसाठी महाविकास आघाडी, युतीसाठी चर्चा होत असल्या तरी स्थानिक पातळीवरील पक्षीय मैत्रीनुसारच पॅनल उभे राहण्याची चिन्हे आहेत. या निवडणुकीत अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी सोमवारी पाच बाजार समित्यांच्या ९० जागांसाठी तब्बल ५३८ अर्ज दाखल झाले आहेत.
आरक्षणनिहाय अर्ज
सहकारी संस्थांचा मतदारसंघातून सर्वसाधारणच्या ३५ जागांसाठी १८८, महिला राखीवच्या १० जागांसाठी ५८, इतर मागासवर्ग राखीवच्या पाच जागांसाठी ३०, विमुक्त जाती, जमाती राखीवच्या पाच जागांसाठी ३३ अर्ज दाखल झाले आहेत. ग्रामपंचायतींच्या मतदारसंघातून सर्वसाधारणच्या १० जागांसाठी ७८, अनुसचूचित जाती, जमाती राखीवच्या पाच जागांसाठी ३८, आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकाच्या पाच जागांसाठी ३१ अर्ज दाखल झाले आहेत. व्यापारी, अडते मतदारसंघाच्या १० जागांसाठी ५० अर्ज, तर हमाल, मापारी मतदारसंघाच्या पाच जागांसाठी ३२ जणांनी अर्ज दाखल केले आहेत.
२० तारखेनंतर होणार चित्र स्पष्ट
दाखल अर्जांची छाननी ५ एप्रिल रोजी होणार आहे, तर ६ एप्रिल रोजी याद्यांची प्रसिद्धी केली जाणार आहे. २० एप्रिलपर्यंत अर्ज माघारी घेण्याची अंतिम तारीख आहे. या तारखेला निवडणूक रिंगणातून कितीजण माघार घेतात यावर निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे.
अर्जांची छाननी
बाजार समिती दाखल अर्ज
अंबड- १०२
घनसावंगी- १०६
परतूर- ६६
आष्टी- ७८
मंठा- १७७