२ लाख विद्यार्थ्यांना मूल्यशिक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2019 12:26 AM2019-07-28T00:26:56+5:302019-07-28T00:27:18+5:30
जिल्हा परिषदेच्या शाळेतील २ लाख विद्यार्थ्यांना शाळेत मूल्यवर्धनाचे धडे दिले जाणार आहेत.
गजानन वानखडे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : लोकशाहीच्या मूल्यांची जपणूक करुन विद्यार्थ्यांना संवेदनशील, कर्तबगार नागरिक बनावे या अनुषंगाने जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेतील २ लाख विद्यार्थ्यांना शाळेत मूल्यवर्धनाचे धडे दिले जाणार आहेत. यामुळे विद्यार्थ्यांची चिकित्सक वृत्ती वाढीस मदत होणार आहे.
राज्य शासन आणि शांतीलाल मुथा फाऊंडेशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना मूल्यवर्धन शिक्षण देण्याचा उपक्रम होती घेण्यात आलेला आहे. २९ जुलै पासून म्हणजेच आजपासून जिल्ह्यात या उपक्रमाला सुरुवात करण्यात येणार आहे. न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता यासह जीवन जगण्यासाठी जे आवश्यक मूल्ये डोळ्यासमोर ठेवून शिक्षक आणि विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ठरले अशी उपक्रम पुस्तिका राज्यशासनाने तयार केली आहे. शिक्षण घेताना विद्यार्थ्यांचे नेतृत्वगुण, जबाबदारी, सहकार्याची भावना, चिकित्सक वृत्ती, सामाजिक भान तसेच सामाजिक समस्याकडे डोळसपणे कसे पाहावे याबाबत विद्यार्थ्यांना या मूल्यवर्धन शिक्षणातून सांगण्यात येणार आहे. इयत्ता १ ते ५ विद्यार्थ्यांना मूल्यवर्धनाचे शिक्षण शिक्षकामार्फत देण्यात येणार आहे. शालेय शिक्षण घेताना विद्यार्थ्यांना आपली सामाजिक जबाबदारी काय आहे. शालेय जीवनातूनच नेतृत्वगुण फुलविण्यासाठी विद्यार्थ्यांनी काय प्रयत्न करावे हे शालेय जीवनापासूनच विद्यार्थ्यांना धडे देऊन त्यांना परिपक्व करण्यासाठी राज्य शासन आणि मुथा फाऊंडेशनच्या वतीने हा उपक्रम सुरु केलेला आहे. जिल्ह्यात सोमवार पासून या उपक्रमाला सुरुवात होणार असून, ६ हजार १६९ शिक्षकांना टप्याटप्याने तज्ज्ञ मंडळीकडून प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यानंतर शिक्षक दैनंदिन अध्यापन करताना हे मूल्यवर्धन उपक्रमाशी सांगड घालतील.
शासनाने विद्यार्थ्यांसाठी सुरु केलेला हा उपक्रम जिल्ह्यात चांगल्या प्रकारे राबविण्यासाठी तयारी पूर्ण करण्यात आली आहे. जिल्ह्यात हा उपक्रम प्रभावीपणे राबविण्यासाठी आमचा प्रयत्न असणार आहे.
विद्यार्थी आणि शिक्षकासाठी उपक्रम पुस्तिका तयार करण्यात आलेल्या आहेत. सर्व तालुकास्तरावर पुस्तिका पोहोचविण्यात आलेल्या आहेत. शिक्षकांचे प्रशिक्षण संपल्यानंतर सप्टेंबर महिन्यापासून विद्यार्थ्यांना मूल्यवर्धनाचे प्रत्यक्षात धडे देण्यात येणार असल्याचे मूल्यवर्धक शिक्षण विभागाचे जिल्हा समन्वयक सतीश सातव यांनी सांगितले.