विद्यार्थ्यांनी श्रमदानातून साकारला वनराई बंधारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2019 12:33 AM2019-01-01T00:33:31+5:302019-01-01T00:33:55+5:30
विशेष श्रमदान शिबिरातून सिध्दार्थ महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या स्वयंसेवक विद्यार्थ्यांनी बेलोरा येथे श्रमदानातून वन बंधारा साकारला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
जाफराबाद : विशेष श्रमदान शिबिरातून सिध्दार्थ महाविद्यालयाच्याराष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या स्वयंसेवक विद्यार्थ्यांनी बेलोरा येथे श्रमदानातून वन बंधारा साकारला आहे. या बंधाऱ्याचा उपयोग परिसरात पाणी अडविण्यासाठी होणार आहे.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आणि सिध्दार्थ महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने जाफराबाद तालुक्यातील बेलोरा येथे सात दिवसांच्या विशेष श्रमसंस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराची सांगता रविवारी करण्यात आली. जलसंवर्धन आणि जलव्यवस्थापनासाठी युवा या ब्रीद वाक्याप्रमाणे स्वयंसेवक विद्यार्थ्यांनी गाव शिवारात दोन ठिकाणी वन बंधारा उभारून जल व्यवस्थापन काय असते याचे महत्व ग्रामस्थांना पटवून दिले.या वन बंधा-यातून जवळपास दोन लाख लिटर पाणीसाठा शिल्लक राहिल असे काम स्वयंसेवक विद्यार्थी यांनी केले आहे.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष दादा साहेब म्हस्के, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ.टी.आर.पाटील,पं.स. सभापती साहेबराव कानडजे, प्राचार्य डॉ अशोक काकडे, डॉ.सुरवसे यांची उपस्थिती होती. अध्यक्षीय समारोप करताना दादासाहेब म्हस्के यांनी विद्यार्थ्यांनी केलेल्या श्रमदान आणि मेहनतीचे कौतुक केले. शिबीर यशस्वी करण्या साठी कार्यक्रम अधिकारी डॉ. नीलेश भोसले, प्रा.सारिका जाधव, प्रा.मनोज पगारे, प्रा.मोरे, अक्षय गवळी यांच्यासह विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.