थकबाकी वसुली उद्दिष्टपूर्तीचा डोंगर तसाच उभा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2018 12:43 AM2018-03-15T00:43:36+5:302018-03-15T00:44:20+5:30
जालना नगर पालिकेची शहरातील मालमत्ता व नळपट्टीपोटी २२ कोटींची थकबाकी आहे. त्यातील जवळपास ४० टक्के वसुली झाली असून, ३१ मार्चपूर्वी १०० टक्के वसुलीचे आव्हान मालमत्ता, कर वसुली विभागावर आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : जालना नगर पालिकेची शहरातील मालमत्ता व नळपट्टीपोटी २२ कोटींची थकबाकी आहे. त्यातील जवळपास ४० टक्के वसुली झाली असून, ३१ मार्चपूर्वी १०० टक्के वसुलीचे आव्हान मालमत्ता, कर वसुली विभागावर आहे. विविध उपक्रम राबवून ही वसुली पालिकेच्या पथकाला करावी लागणार आहे. तरीही अवघ्या पंधरा दिवसांत उद्दिष्टपूर्वी होईल का, याबाबत साशंकताच आहे.
जालना शहरात एकूण ६० हजार मालमत्ता असून, मोठ्या प्रमाणात मालमत्ता कर थकलेला आहे. नळपट्टीचेही तेच आहे. या थकबाकीमुळे शहर विकासाला खीळ बसलेली आहे. अलिकडे शासनाच्या दबावामुळे मालमत्ता कर वसुलीसाठी कडक धोरण राबविण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतलेला असून, पथकांवर जबाबदाऱ्या निश्चित केलेल्या आहेत. परंतु आजपर्यंत झालेल्या वसुलीचा आकडा पाहता विहित मुदतीत सदर उद्दिष्ट पूर्ण होईल, याबाबत साशंकता आहे. वसुली शंभर टक्के न करणा-यांवर कडक कारवाईचे संकेत यापूर्वीच मिळालेले असले तरी पथकातील अधिका-यांवर त्याचा काही परिणाम झाल्याचे दिसून येत नाही. राज्याच्या नगरविकास खात्याने कर वसुलीचा आढावा घेण्याचे काम सुरु केलेले आहे, ज्या पालिका मालमत्ता कर वसूल करणार नाहीत, त्यांच्या विकास निधीला कात्री लावली जाईल, असे संकेत यापूर्वीच दिले केलेले असल्याने अधिकारी कामाला लागलेले आहेत.
तर १ कोटींच्या निधीवर पाणी फिरणार
जालना नगर परिषदेच्या वसुली पथकाला उद्दिष्ट देण्यात आलेले आहे. संबंधितांनी त्याची पूर्तता केली नाही तर कारवाईची टांगती तलवार कायम आहे. प्रशासकीयस्तरावर कर वसुलीसाठी सर्वते प्रयत्न केले जात असले तरी त्यातून ८० टक्के कर वसुली होईल का, असा प्रश्न आहे.
जालना नगर परिषदेची मालमत्ता कर वसुली आजमितीस ४० टक्क्यांवर आलेली आहे. मार्चएण्डपर्यंत उर्वरित म्हणजेच उद्दिष्टासाठीची ४० टक्के वसुली होणार की नाही, याबाबत साशंकता आहे. जर का कर वसुलीचा आकडा ८० टक्क्यांपर्यंत गेला नाही तर पालिकेला मिळणाºया १ कोटी रुपयांच्या विकास निधीवर पाणी फिरेल, हे मात्र निश्चित.