भोकरदन तालुक्यातील पशुवैद्यकीय सेवा वाऱ्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2020 04:25 AM2020-12-25T04:25:20+5:302020-12-25T04:25:20+5:30
भोकरदन : भोकरदन तालुक्यातील पशुसंवर्धन विभागाला मागील दोन वर्षांपासून रिक्तपदाचे ग्रहण लागले असून, या विभागात महत्त्वाची पदे रिक्त असल्याने ...
भोकरदन : भोकरदन तालुक्यातील पशुसंवर्धन विभागाला मागील दोन वर्षांपासून रिक्तपदाचे ग्रहण लागले असून, या विभागात महत्त्वाची पदे रिक्त असल्याने पशुवैद्यकीय सेवा वाऱ्यावर आहे. त्यामुळे पशुपालकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. १६ पैकी ९ पशुवैद्यकीय दवाखान्यात डॉक्टरच नसल्याने जनावरांना वेळेवर उपचार मिळत नाही.
भोकरदन तालुक्यात एकूण १६ पशुवैद्यकीय दवाखाने आहेत. यात ७ दवाखाने केंद्र शासनाचे आहे तर ९ दवाखाने जिल्हा परिषदेचे आहेत. मात्र, त्यापैकी ६ पशुधन विकास अधिकाऱ्यांची पदे रिक्त आहेत तर तालुका पशुधन विकास अधिकाऱ्याचे पद सुद्धा रिक्त आहेत. त्यामुळे या पदाचा अतिरिक्त पदभार पशुधन विकास विस्तार अधिकाऱ्याकडे सोपविण्यात आला आहे. तालुक्यात १ लाख २३ हजार ३९५ जनावरांची संख्या आहे. मात्र, पशुधनावर उपचार करण्यासाठी पशुवैद्यकीय अधिकारीच नसल्याने उपचाराअभावी जनावरांचे मोठे हाल होत आहे. पशुपालकांना खासगी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडूनच उपचार करुन घ्यावे लागत असल्याने आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. त्यामुळे तालुक्यातील पशुसेवा वाऱ्यावर असल्याने आता गावागावात पशुपालकांच्या जनावरांवर उपचार करण्यासाठी खासगी पशुवैद्यकीय डॉक्टर मोठ्या प्रमाणात अवतरले आहे. याकडे पशुसंवर्धन विभागाने लक्ष देऊन रिक्त पदे भरण्याची मागणी होत आहे.
शेतीला पशुधनाचा जोड व्यवसाय म्हणून शेतकरी गाय, म्हैस ही दुभती जनावरे वाढवून दूध व्यवसायाकडे वळत आहे. त्यामुळे तालुक्यात मोठ्या प्रमाणात गावांगावामध्ये दूध डेअरी झाल्याने दुभत्या जनावरांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. मात्र, पशुधनावर उपचार करण्यासाठी पशुवैद्यकीय अधिकारीच नसल्याने जनावरांचे आरोग्य धोक्यात आले आहे. तालुक्यातील आन्वा, पारध, जवखेडा, नळणी, हसनाबाद, वरुड या श्रेणी २ च्या पशुवैद्यकीय दवाखान्यात पशुधन विकास अधिकारी नसल्याने या दवाखान्याचा अतिरिक्त पदभार जळगाव सपकाळ, चांधई टेप्ली, तळेगाव येथील पशुधन विकास अधिकारी यांच्याकडे देण्यात आला आहे. त्यातच आता पशुधनाची आधार नोंदणी व लसीकरणाची मोहीम सुरु असल्याने या मोहिमेला विलंब होत आहे.
कोट
तालुक्यातील अनेक पशुवैद्यकीय दवाखान्यात डॉक्टर नसल्याने पशुधनावर वेळेवर उपचार होत नाही. त्यामुळे नाईलाजाने पशुपालकांना खासगी डॉक्टरांकडून उपचार करावे लागते. पशुसंवर्धन विभागाने लक्ष देऊन रिक्त असलेले पदे भरावी, अशी मागणी जि.प. सदस्य सुभाष देशमुख यांनी केली आहे.
भोकरदन तालुक्यात रिक्तपदामुळे जनावरांच्या औषध उपचारासाठी मोठ्या अडचणी येत आहे. अपुऱ्या पदामुळे पशुसेवा देताना आमची दमछाक होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा रोष देखील ओढावून घ्यावा लागतो. यासाठी रिक्त पदे भरणे गरजेचे आहे.
एस.एस.जोशी, पशुधन पर्यवेक्षक, भोकरदन