अवैध वाळू वाहतुकीने घेतला शेतमजुराचा बळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2017 12:51 AM2017-11-28T00:51:06+5:302017-11-28T00:51:28+5:30
जाफराबाद : वाळू वाहतूक करणा-या टिप्परने दुचाकीला धडक दिल्याने ३५ वर्षीय शेतमजुराचा मृत्यू झाला. देऊळगाव उगले पाटीजवळ रविवारी रात्री ...
जाफराबाद : वाळू वाहतूक करणा-या टिप्परने दुचाकीला धडक दिल्याने ३५ वर्षीय शेतमजुराचा मृत्यू झाला. देऊळगाव उगले पाटीजवळ रविवारी रात्री ही घटना घडली. दरम्यान, टिप्परचालकावर कारवाईच्या मागणीसाठी संतप्त नातेवाईकांनी सोमवारी मृतदेह जाफराबाद पोलीस ठाण्यात आणत ठिय्या आंदोलन केले. त्यामुळे काही वेळ तणाव निर्माण झाला होता.
विलास सीताराम सोनुने (वानखेडा, ता. जाफराबाद) असे मृत शेतमजुराचे नाव आहे.
सोनुने आईवडिलांच्या भेटीसाठी आंबेगावहून वानखेडा येथे आले होते. रात्री दुचाकीने आंबेगावकडे परत जात असताना देऊळगाव उगले पाटीजवळ एका वाळू वाहतूक करणाºया भरधाव टिप्परने सोनुने यांच्या दुचाकीला धडक दिली. त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर टिप्परचालक पसार झाला. पो.कॉ. भास्कर जाधव यांनी पंचनामा केला. घरची परिस्थिती बेताची असल्याने सोनुने परिवारासोबत आंबेगाव येथे मिरची, टोमॅटो सेडनेटमध्ये मजूर म्हणून काम करत होते. या पूर्वीही अशाच घटनेत एकाचा मृत्यू झाल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
-------------
मृतदेह पोलीस ठाण्यात
अवैध वाळू वाहतूक करणा-या टिप्परने विलास सोनुने यांचा बळी घेतला. या टिप्पर चालकाचा शोध घेऊन त्याच्यावर गुन्हा दाखल करावा, तसेच अवैध वाळू वाहतूक थांबवा या मागणीसाठी वानखेडा येथील ग्रामस्थांनी जाफराबाद पोलीस ठाण्यासमोर सोनुने यांचा मृतदेह ठेवून सोमवारी दुपारपर्यंत ठिय्या आंदोलन केले. पोलीस निरीक्षक पाटील, तहसीलदार जे.डी. वळवी यांनी ग्रामस्थांना कारवाईचे लेखी आश्वासन दिल्यानंतर ग्रामस्थांनी मृतदेह ताब्यात घेतला.