लॉकडाऊनचा बळी; उदरनिर्वाह बंद झाल्याने रिक्षाचालकाने संपवले जीवन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2020 07:55 PM2020-08-06T19:55:35+5:302020-08-06T19:58:36+5:30
सायंकाळी सात वाजले तरी घरी न आल्याचे पत्नी तसेच मुलाने त्यांचा शोध घेतला.
आव्हाना (जि. जालना) : कोरोना विषाणूमुळे गेल्या चार महिन्यांपासून लॉकडाऊन असल्याने रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला. उदरनिर्वाहाचे साधन नसल्यामुळे भोकरदन तालुक्यातील परेजापूर येथील रिक्षा चालक देवीदास भगवान तळेकर (४०) यांनी बुधवारी विष घेऊन आत्महत्या केली.
आत्महत्या करण्याआधी चिठ्ठीत देविदास तळेकर यांनी चिठ्ठी लिहिली. या चिठ्ठीत त्यांनी लिहिले की, ‘आपण रिक्षा घेण्यासाठी सहकारी बँक, पतसंस्थांकडून पाच लाख रूपयांचे कर्ज घेतले होते. हे कर्ज फेडण्याची चिंता सतावत होती. त्यातच गेल्या चार महिन्यांपासून लॉकडाऊनमुळे वाहतुकीवर बंधने आल्याने रिक्षाची चाके ठप्प होती. त्यामुळे घेतलेले कर्ज फेडायचे कसे असा प्रश्न निर्माण झाला होता. त्यातही यंदा पैशांअभावी पेरणी करता आली नाही. त्यामुळे आपण जीवन संपवित आहोत.’ देविदास तळेकर यांना पेरजापूर येथे एक एकर शेती आहे. मंगळवारी सायंकाळी सकाळपासून देविदास तळेकर हे घरी आले नव्हते. सायंकाळी सात वाजले तरी घरी न आल्याचे पत्नी तसेच मुलाने त्यांचा शोध घेतला.
यावेळी गावातील काही जणांना देविदासच्या शेतात त्यांचा मृतदेह आढळून आला. त्यांना तातडीने उपचारासाठी आव्हाना येथील आरोग्य केंद्रात नेले असता, त्यांना मृत घोषित करण्यात आले. त्यांच्यावर बुधवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा असा परिवार आहे.