राज्य शासनाकडून ओबीसी आरक्षणाचा बळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2021 04:35 AM2021-09-15T04:35:21+5:302021-09-15T04:35:21+5:30
जालना : ओबीसी समाजाचे स्थानिक स्वराज्य संस्थेमधील आरक्षण घालविण्यासाठी राज्य शासनाची खेळी असून, ओबीसी आरक्षणाचा राज्यातील महाविकास आघाडी सरकारने ...
जालना : ओबीसी समाजाचे स्थानिक स्वराज्य संस्थेमधील आरक्षण घालविण्यासाठी राज्य शासनाची खेळी असून, ओबीसी आरक्षणाचा राज्यातील महाविकास आघाडी सरकारने बळी घेतल्याचा आरोप भाजपा जिल्हा उपाध्यक्ष तथा भास्कर दानवे यांनी केला. तसेच राज्य शासनाच्या निषेधार्थ बुधवारी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले जाणार असल्याची माहितीही दानवे यांनी दिली.
जालना येथे मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी भाजपा ओबीसी मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष अशोक पांगारकर यांनीही ओबीसी आरक्षणाबाबत बाजू मांडली. यावेळी जिल्हा संघटन सरचिटणीस सिद्धिविनायक मुळे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य बद्रीनाथ पठाडे, भाजपा तालुकाध्यक्ष वसंतराव शिंदे, ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष कपील दहेकर, बाबासाहेब कोलते, ओबीसी मोर्चा तालुकाध्यक्ष सतीश केरकळ, पं.स.सदस्य कैलास उबाळे, नगरसेवक सुनील पवार, सोपान पेंढारकर आदींची उपस्थिती होती.
धुळे, नंदुरबार, अकोला, वाशिम व नागपूर येथील निवडणुका शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे जाहीर झाल्या. जर या आघाडी सरकारने वेळीच इंपेरिकल डेटा कोर्टाला दिला असता तर आज ओबीसी बांधवावर निवडणुकीतून हद्दपार व्हायची वेळ आली नसती, असेही ते म्हणाले. त्यामुळे राज्य शासनाच्या निषेधार्थ भाजपच्या वतीने बुधवारी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले जाणार असल्याचेही दानवे म्हणाले. यावेळी भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.