पाणी टंचाईचा बळी! पीक येणार नाही, कर्ज कसे फिटणार; शेतकरी दाम्पत्याने जीवन संपवले
By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2024 03:52 PM2024-03-20T15:52:11+5:302024-03-20T15:55:48+5:30
पाण्याच्या टंचाईमुळे शेतकरी दम्पत्याची आत्महत्या : वृद्ध वडील व मुलांवर कोसळला दुःखाचा डोंगर
अंबड: तालुक्यातील बन टाकळी शिवारातील गट नंबर-५ मधील शेतामध्ये विषारी द्रव्य प्राशन करून एका शेतकरी दंपत्याने आपली जीवन यात्रा संपवली. हृदयद्रावक अशी ही घटना आज सकाळी उघड झाली. संगीता ( ४० ) आणि अशोक नानासाहेब कानकाटे ( ४४ ) असे मृत दांपत्याचे नाव आहे. पाणी नसल्याने मोसंबी बाग जगणार नाही, यामुळे उत्पन्न होणार नसल्याने कर्ज कसे फेडायचे या विवंचनेत दाम्पत्याने जीवन संपवल्याची माहिती नातेवाइकांनी दिली आहे.
अंबड शहरापासून जवळच असलेल्या बनटाकळी येथील तीन एकर शेतीमध्ये कांद्याच्या पिकाचे काढणीचे काम सुरु आहे. येथे संगीता आणि आशिक कानकाटे हे दाम्पत्य सकाळीच कामासाठी आले होते. दरम्यान, काही शेतमजूरांच्या नजरेस कानकाटे यांचा मृतदेह आला. त्यांनी ही माहिती त्यांचे नातेवाईक आणि पोलिसांना दिली. त्यांच्या पश्चात दोन मुली, एक मुलगा आणि वृद्ध वडील आहेत. मुलगा मुंबई येथे मोलमजुरीचे काम करतो, एका मुलीचे लग्न झाले असून तिचे लग्नाचे कर्जही देणे बाकी असल्याचे, तसेच काही बचत गटाचे कर्ज त्यांच्याकडे होते. दीड एकर मोसंबीला देण्यासाठी पाणी नसल्याने लोकांचे देणे कसे फेडायचे या विवंचनेत ते होते असे नातेवाईकाने सांगितले.
दरम्यान, आर्थिक अडचणीला कंटाळून शेतकरी दाम्पत्याने विषारी डाव्य प्राशन केल्याचे नातेवाईकांनी सांगितले. अंबड येथील उपजिल्हा रुग्णालयात सर्व नातेवाईकांनी धाव घेतली असून हळहळ व्यक्त केली जात आहे. अंबड पोलीस ठाण्यात बुधवारी दुपारी गुन्हा दाखल. करण्याचे प्रक्रिया सुरू होती.