पाण्यावरून विदर्भ-मराठवाडा वादास सुरुवात; विदर्भातील नागरिकांनी वॉटरग्रीड योजनेचे काम रोखले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2019 07:34 PM2019-01-24T19:34:47+5:302019-01-24T19:37:48+5:30
आमच्या हक्काचे पाणी मराठवाड्यात नेऊ देणार नाही.
तळणी (जालना ) : आमच्या हक्काचे पाणी मराठवाड्यात नेऊ देणार नाही, अशी भूमीका घेत देऊळगावमही येथील खडकपूर्णा परिसरात सुरु असलेल्या वॉटरग्रीड योजनेच्या विहिरीचे काम रोखल्याने या योजनेला ग्रहण लागले आहे. पाण्यावरुन मराठवाडा- विदर्भ प्रादेशिक वादाला सुरुवात झाली आहे.
पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी नुकतेच जालना, परतूर, मंठा तालुक्यातील ९२ गावांचा वॉटरग्रीड योजनेच्या जलकुंभाचे नेर- सेवली आणि तळणी येथे भूमिपूजन केले. ही योजना दोन वर्षात पूर्ण होणार असून ९२ गावांचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी सुटणार असल्याचा दावा लोणीकरांनी केला होता. मात्र, विदर्भातील देऊळगावराजा, देऊळगाव मही आणि अन्य गावातील ग्रामस्थांनी येथील खडकपुर्णा प्रकल्पात सुरु असलेल्या विहीरीचे काम संतप्त नागरिकांनी रोखले. यामुळे योजनेच्या सुरुवातीलाच ग्रहण लागले आहे.
योजनेचे काम होणारच - लोणीकर
वॉटरग्रीड योजनेची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाली असून या योजनेचे काम वेळेत पूर्ण होणार असल्याचे पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.
२८ जानेवारीला मोर्चा
खडकपुर्णा प्रकल्पात सुरु असलेल्या विहीरीचे कामही रोखले असून २६ जानेवारीला सर्व ग्रा.पं मध्ये हे पाणी देण्याच्या विरोधात ठराव घेण्यात येणार आहे. २८ जानेवारीला देऊळगावराजा येथे मोर्चा काढण्यात येणार असल्याचे राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष राम खांडेभराड यांनी सांगितले.