Video: शेतीनेच दिला स्वाभिमान अन् आधार; दोन्ही हात नसताना तरुण राबतोय शेतात
By दिपक ढोले | Published: August 17, 2023 06:07 PM2023-08-17T18:07:10+5:302023-08-17T18:08:25+5:30
जिद्दीला सलाम! दोन्ही हात नसतानाही तरुण करतोय शेती, मेहनतीने पिकवलं सोन्यासारख पिक
जालना : भोकरदन तालुक्यातील करजगाव येथील तरुण चौरंगीनाथ प्रभाकर लोखंडे (२८) याला जन्मापासूनच दोन हात नाही. त्यामुळे पायाने लिहून बी.ए.पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. सुदैवाने नोकरी लागली नसल्याने शेती करण्यास सुरुवात केली. दोन्ही हात नसतानाही चांगल्याप्रकारे शेती करून तो कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आहे.
करजगाव येथील प्रभाकर लोखंडे यांना दोन मुले आहेत. त्यातील चौरंगीनाथ या मुलाला लहानापासूनच दोन हात नव्हते. असे असतानाही त्याने जिद्दीच्या जोरावर प्राथमिक शिक्षण गावातीलच शाळेत पूर्ण केले. नंतर माध्यमिक शिक्षण हे पिंपळगाव रेणुकाई येथे पूर्ण केले. हात नसल्याने त्याने पायाने लिहून शिक्षण पूर्ण केले. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नोकरीचा शोध घेतला. परंतु, काहीच फायदा झाला नाही. नोकरी न मिळाल्याने त्याने दहा एकर शेती करण्याचा निर्णय घेतला. हात नसल्याने शेती करणेही अवघड होते, असे असतानाही मेहनत, जिद्दीच्या जोरावर त्याने शेती करण्यास सुरुवात केली. कधी कोळपणी, तर कधी वखरणी करीत आहे. शेतात मेहनत करून आज तो चांगले उत्पन्न काढत आहे. कामाच्या जिद्दीमुळे त्याचे कौतुक केले जात आहे.
सर्व कामे स्वत:च करतोय चाैरंगीनाथ
चाैरंगीनाथ हा पायाने लिहून शाळा शिकला. त्याने पदवीचे शिक्षण पूर्ण केले. शिवाय, अंघोळ करणे, कपडे घालणे, मोबाइल हाताळणे, बैलगाडी जुपविणे, कोळपणी, वखरणी करणे आदी कामे तो हातानेच करतो. त्याला इतरांच्या मदतीची गरज नाही.
सरकारी नोकरी देण्याची मागणी
चौरंगीनाथ याचे अद्याप लग्न झालेले नाही. त्याचे पदवीपर्यंतचे शिक्षण झालेले आहे. असे असतानाही त्याला नोकरी लागली नाही. १०० टक्के अपंग असताना कोणी नोकरी घेत नाही. त्यामुळे राज्य सरकारने आपल्याला नोकरीवर घ्यावे, असे मागणी चौरंगीनाथ लोखंडे याने केली आहे.