Video: नादच खुळा! वरातीनंतर नवरदेव वाट पाहत राहिला; नवरीने केली थेट जेसीबीतून एंट्री

By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2022 03:28 PM2022-07-07T15:28:17+5:302022-07-07T15:32:57+5:30

शेतकरी कन्येच्या विवाहातील आगळावेगळ्या रुबाबाची पंचक्रोशीत चर्चा

Video: Nadkhula! After the Warat, groom waited; Bride made an entry directly from JCB | Video: नादच खुळा! वरातीनंतर नवरदेव वाट पाहत राहिला; नवरीने केली थेट जेसीबीतून एंट्री

Video: नादच खुळा! वरातीनंतर नवरदेव वाट पाहत राहिला; नवरीने केली थेट जेसीबीतून एंट्री

Next

जालना : जामवाडी येथे नुकत्याच झालेल्या एका लग्नाची सध्या जोरदार चर्चा आहे. ही चर्चा सुरु झाली आहे ती नवरीच्या लग्न मंडपातील प्रवेशामुळे. कारणही तसेच आहे, शेतकरी असेलेल्या रायकर कुटुंबातील नवरीने जेसीबीवर एंट्री केल्याने अख्ख वऱ्हाड आणि नवरदेव देखील अवाक् झाले होते. नवरीच्या नाद खुळ्या एंट्रीमुळे राजकर-आहेर हा विवाह सोहळा चांगलाच लक्षात राहील अशी चर्चा ग्रामस्थात सुरु आहे. 

जामवाडी येथील विजय आणि विठ्ठल भीमराव राजकर हे दोघे भाऊ प्रगतीशील शेतकरी म्हणून ओळखले जातात. विठ्ठल राजकर यांची कन्या वृषाली एमबीए झालेली असून घरातील सर्वात लहान आहे. त्यामुळे तिचे लग्न अविस्मरणीय ठरावे अशी सर्वांची इच्छा होती. यातूनच नवरीच्या काकाने आणि भावाने लग्न मंडपात वृषालीची जेसीबीतून एंट्री करू अशी कल्पना मांडली. घरातील सर्वांनी यास होकार दिला. मात्र, याची इतर कोणालाही लग्नदिवसापर्यंत माहिती नव्हती.

राजकर कुटुंबीयांकडून लग्नाची जय्यत तयारी करण्यात आली. शाही विवाह सोहळ्यात दोन्ही कडील अनेक पाहुणे आले. लग्नातील मानपान, लक्षवेधी तयारीची पाहुणेमंडळीत चर्चा सुरु असतानाच वरातीनंतर नवरदेव लग्न मंडपाच्या दारी आला. नवरीसोबत प्रवेश करण्यासाठी नवरदेव वाट पाहत होता. नवरीच्या प्रतीक्षेत असलेल्या सर्वांच्या नजरा वळल्या त्या जेसीबीच्या जोरदार आवाजाने. सर्वांच्या माना तिकडे वळल्या आणि आश्चर्याचा धक्काच बसला. सजवलेल्या जेसीबीच्या समोरच्या बकेटमध्ये लाल रंगाच्या पेहरावात तयार झालेली नवरी उभी होती. वाजतगाजत जेसीबी लग्न मंडपांजवळ आला. त्यानंतर नवरीने खाली उतरून नवरदेवासोबत आत प्रवेश केला. 

शेतकरी कुटुंबातील काका आणि भावाने घरातील लाडक्या लेकीसाठी केलेला हा अनोखा प्रयोग सर्वांसाठी अविस्मरणीय असल्याच्या भावना वधूपिता विठ्ठल राजकर यांनी व्यक्त केल्या. लग्न उत्साहात पार पडले पण नवरीच्या या जबरदस्त एंट्रीची चर्चा पंचक्रोशीत अजूनही सुरूच आहे.

Web Title: Video: Nadkhula! After the Warat, groom waited; Bride made an entry directly from JCB

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.