Video: जालन्यात पेट्रोल पंपावर दरोडा, पोलिसांनी रात्रीतूनच ५ दरोडेखोरांना घेतले ताब्यात
By दिपक ढोले | Published: July 15, 2023 11:39 AM2023-07-15T11:39:23+5:302023-07-15T11:44:26+5:30
जालना ते देऊळगाव राजा रोडवर इंडियन ऑईलच्या पेट्रोल पंपावर मध्यरात्रीचा थरार
जालना : दारू पिऊन पेट्रोलपंपावरील कर्मचाऱ्यांना एअर गन व खंजीरचा धाक दाखवून दरोडा टाकणाऱ्या पाच जणांच्या अवघ्या चार तासांत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मुसक्या आवळल्या आहेत. ही कारवाई आज पहाटे करण्यात आली. गणेश प्रल्हाद विधाते (२१, रा. लालबाग, जालना), साबेर सय्यद निसार सय्यद (२१, रा. चंदनझिरा, जालना), कैसर ऊर्फ सोनू सांडू शेख (२६, रा. मियासाब दर्गा मस्तगड, जालना), शेख आजम शेख मुख्तार (२२, रा. जमुनानगर, जालना), योगेश एकनाथ खणपटे (२८, रा. जमुनानगर, जालना) अशी ताब्यात घेतलेल्या संशयितांची नावे आहेत. त्यांच्याकडून दोन चाकू, एक एअर गण, दोन दुचाकी, मोबाइलसह लुटलेली रक्कम असा एकूण १ लाख ३६ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
शुक्रवारी रात्री जामवाडी येथील इंडियन ऑइन पेट्रोलपंपावर पाच जणांनी कर्मचाऱ्यांना चाकू आणि एअर गनचा धाक दाखवून ३२ हजार रुपये लंपास केले होते. याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपी सीसीटीव्हीमध्ये कैद झाले होते. पोलिसांनी सीसीटीव्हीची पाहणी करून आरोपींची ओळख पटविली. सुरुवातीला पोलिसांनी संशयित गणेश विधाते याला ताब्यात घेतले. त्याला विचारपूस केली असता, त्याने साथीदारांसह गुन्हा केल्याची कबुली दिली. अन्य चार आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्यांनी दारू पिऊन हा प्लॉन आखल्याचे पोलिसांनी सांगितले. चार तासांत पोलिसांनी आरोपींना जेरबंद केले आहे.
जालना: देऊळगाव राजा ते जालना रस्त्यावरील जामवाडी येथील पेट्रोल पंपावर दरोडा. pic.twitter.com/nzprBxkBgS
— Lokmat Chhatrapati Sambhajinagar (@milokmatabd) July 15, 2023
यांनी केली कारवाई
ही कारवाई पोलिस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलिस अधीक्षक राहुल खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोनि. रामेश्वर खनाळ, सपोनि. आशिष खांडेकर, पोउपनि. प्रमोद बोंडले, सॅम्युअल कांबळे, गोकुळसिंग कायटे, विनोद गडदे, कृष्णा तंगे, सागर बाविस्कर, दत्तात्रय वाघुंडे, सचिन चौधरी, प्रशांत लोखंडे, योगेश सहाने, धीरज भोसले यांनी केली आहे