तरुणीच्या विनयभंगाचा व्हिडीओ व्हायरल; पोलिसांनी सहाजणांना घेतले ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2020 07:34 PM2020-01-31T19:34:17+5:302020-01-31T19:40:42+5:30
गुराख्यांनी प्रेमी युगुलाला मारहाण करून तरुणीचा केला विनयभंग
जालना : तालुक्यातील गोंदेगाव शिवारातील वनक्षेत्रात २९ जानेवारी रोजी दुपारी आलेल्या प्रेमीयुगुलाला गुराख्यांनी मारहाण केली. संबंधितांनी मारहाणीचा केलेला व्हिडिओ शुक्रवारी सकाळी व्हायरल झाल्याने हा प्रकार समोर आला. घटनेची माहिती मिळताच तीन ते साडेतीन तासात पोलिसांनी चार आरोपींसह दोघा संशयितांना ताब्यात घेतले आहे.
तरुणीचा विनयभंग करून प्रेमी युगलास टवाळखोरांची मारहाण; व्हायरल व्हिडीओने सर्वत्र संताप
बुलडाणा जिल्ह्यातील एका तरुणासह एक तरुणी २९ जानेवारी रोजी दुपारी गोंदेगाव (ता.जालना) शिवारात आले होते. गोंदेगाव शिवारातील वनक्षेत्रात ते बसले असता जनावरे चारणाऱ्या गुराख्यासह सहा ते सात मुलांनी त्या दोघांना हटकले. ते इथे कसे काय आले ? तुझ्या वडिलांचा मोबाईल नंबर दे असे म्हणत त्या युवकांनी मुलासह मुलीला मारहाण करण्यास सुरूवात केली. मुलाने आपल्या भावाला फोन लावून दिला. तरीही ती मुलं त्या दोघांना मारहाण करीत असल्याचे व्हिडिओत दिसून येत आहे.
गुराख्यांनी व मुलांनी प्रेमी युगुलाला मारहाण करून मुलीचा विनयभंग केल्याचा व्हिडिओ शुक्रवारी सकाळी व्हायरल झाला. हा व्हिडिओ पोलीस अधीक्षक एस. चैतन्य यांच्याकडे आल्यानंतर त्यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली. पोलीस अधीक्षकांच्या सूचनेनुसार उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर, दरोडा प्रतिबंधक पथकाचे पोनि यशवंत जाधव, तालुका जालना पोलीस ठाण्याचे पोनि सुरेशकुमार गंदम, सपोनि रामोड, जोगदंड, पोउपनि मोरे, पोकॉ गायके आदींनी तात्काळ तपासाची चक्रे फिरविली. शुक्रवारी सायंकाळपर्यंत गोंदेगाव गावच्या शिवारातून सहा जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. यातील बहुतांश आरोपी हे अल्पवयीन असल्याचे पोलिसांनी सांगितले.
केला टिकटॉक व्हिडिओ
गुराख्यांनी मुलासह मुलीला मारहाण केल्याचा व्हिडिओ केला. सोबत फोटो काढले आणि त्या फोटोचा वापर करून त्याद्वारे टिकटॉक व्हिडिओ तयार केला. हा टिकटॉक व्हिडिओ आणि मारहाणीचा व्हिडिओ गोंदेगाव शिवारातील अनेकांच्या मोबाईलवर व्हायरल झाला आहे.
तर पोलीस देणार तक्रार
संबंधित मुला, मुलीच्या नातेवाईकांशी पोलिसांनी संपर्क साधला आहे. या प्रकरणात पीडित मुलीने, मुलाने किंवा त्यांच्या नातेवाईकांनी तक्रार द्यावी, यासाठी पोलीस प्रयत्न करीत आहेत. त्यांच्याकडून तक्रार आली नाही तर या प्रकरणात सरकार पक्षाकडून पोलीस तक्रार देणार असल्याचे सांगण्यात आले.
तपास सुरू आहे
गोंदेगाव येथील प्रकरणात सहा संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. यातील बहुतांश आरोपी संशयित आहेत. त्यांच्याकडे चौकशी सुरू असून, लवकरच इतर आरोपीही ताब्यात घेतले जातील.
- एस. चैतन्य, पोलीस अधीक्षक, जालना