"लेकरं लेकरं करतो, मग इकडं काय बकरं आहेत का?"; जरांगेंवर जोरदार प्रहार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2023 06:49 PM2023-11-17T18:49:47+5:302023-11-17T18:51:32+5:30
आमचा मराठा आरक्षणाला विरोध नाही. मात्र, ओबीसीतून आरक्षण देऊ नये.
जालना/मुंबई - जालना जिल्ह्यातील अंबड येथे ओबीसी समाजाच्या मेळाव्यात मंत्री छगन भुजबळ यांच्यासह सर्वच ओबीसी नेत्यांनी मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्यावर वैयक्तीक टीका केली. छगन भुजबळ यांनी त्यांचं शिक्षण किती आणि त्यांना समजावायला न्यायमूर्ती जातात, असे म्हणत तो पाचवी तरी शिकलाय का, असा सवाल केला. तसेच, हा छगन भुजबळ स्वकष्टाचं खातो. तुझ्यासारखं सारसऱ्याच्या घरी तुकडा मोडत नाही, असा टोलाही भुजबळ यांनी लगावला. दुसरीकडे राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनीही जरांगे पाटलांवर जोरदार हल्लाबोल केला.
आमचा मराठा आरक्षणाला विरोध नाही. मात्र, ओबीसीतून आरक्षण देऊ नये. ५६ मराठा मोर्चे निघाले पण आम्ही कुणाला विरोध केला नाही. मात्र आम्ही कुणाचं घरं, दारं जाळली नाहीत, असे भुजबळ यांनी म्हटले. तर, विजय वडेट्टीवार यांनी अंबड येथील सभेतून ओबीसी समाजाची परिस्थिती समजावून सांगितली. यावेळी, जरांगे यांच्यावर जोरदार प्रहार केला. सारखं, लेकरं.. लेकरं.. करतो मग इकडं काय बकरं आहेत का, कापायला? असा सवाल वडेट्टीवार यांनी केला. तसेच, काहीजण म्हणतात आमच्याकडे जमिनी उरल्या नाहीत. मराठा २० एकरवरुन ५ एकरवर आलाय. मग, ज्यांच्याकडे जमिनीच नाहीत, जे भूमीहीन आहेत, त्यांचं काय?, त्यांनी कसं जगायचं?, असा सवालही विजय वडेट्टीवार यांनी अंबड येथील सभेतून केला आहे.
दरम्यान, आता जरांगे पाटलांनी सांगलीतील सभा संपताच छगन भुजबळ यांच्या टीकेला प्रत्यूत्तर दिले. छगन भुजबळ हे वादग्रस्त वक्तव्य करून राज्यात दंगली पेटवण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप पाटलांनी केला आहे. तसेच, यापुढे आपण त्यांना किंमतच देणार नाही. राजकीय नेत्यांनी कितीही प्रयत्न केला तरी मराठा आणि ओबीसी यामध्ये कोणत्याही प्रकारचा संघर्ष निर्माण होणार नाही, असे जरांगे यांनी म्हटले. मात्र, छगन भुजबळ हे वादग्रस्त वक्तव्य करून राज्यात दंगली पेटवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांचे षडयंत्र यशस्वी होणार नाही, असेही मनोज जरांगे यांनी म्हटले.
जीवात जीव असेपर्यंत ओबीसी समाजाच्या आरक्षणासाठी लढणार. ओबीसींच्या हक्कासाठी आम्ही लढत असताना कोणी धमक्या दिल्या तरी आम्ही लढत राहणार. पद येतील जातील. पदापेक्षा समाजातील उपेक्षित वर्गाला न्याय देणे महत्वाचे आहे.#obc#ओबीसीpic.twitter.com/cbGaV17rcZ
— Vijay Wadettiwar (@VijayWadettiwar) November 17, 2023
भुजबळांवर जरांगेंचा पलटवार
छगन भुजबळ हे माझ्यावर वैयक्तिक टीका करत असून ते खालच्या पातळीवरच राजकारण करत आहेत. माझ्यावर टीका करण्या अगोदर तुम्ही पैसे खावून, जेल भोगून आला आहात याची आठवण तुम्हाला असू दे, असा टोलाही जरांगे पाटील यांनी लगावला. तुम्ही टीका केली तर, तुम्हाला उत्तर देण्यासाठी आम्ही कच्चे नाहीत. या राज्यात आम्ही वातावरण खराब होऊ देणार नाही. आता आम्ही देखील ५० टक्के आहोत. लोकांचे पैसे खाता, रक्त पिता का? मग तुम्हाला कोण देव मानणार आहे. मराठ्यांना आरक्षण मिळाल्याशिवाय एक इंचही मागे हटणार नाही, त्यामुळे मराठा बांधवांनी सुध्दा एक डिसेंबर २०२३ पासून प्रत्येक गावात साखळी उपोषण करावे, असे आवाहनही जरांगे पाटील यांनी केले.