देशसेवेला वाहिलेले गाव-अकोला देव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2018 12:39 AM2018-08-15T00:39:09+5:302018-08-15T00:39:43+5:30
ग्रामीण भागातील अनेक गावांनी आपली एक वेगळी विशेषत: जपली आहे. टेंभुर्णीपासून अवघ्या ३ कि. मी. अंतरावर असणाऱ्या अकोला देव या गावाने मातृभूमीच्या रक्षणासाठी जवान देऊन आपली असीम राष्ट्रभक्ती जपली आहे
नसीम शेख ।
लोकमत न्यूज नेटवर्क
टेंभुर्णी : ग्रामीण भागातील अनेक गावांनी आपली एक वेगळी विशेषत: जपली आहे. टेंभुर्णीपासून अवघ्या ३ कि. मी. अंतरावर असणाऱ्या अकोला देव या गावाने मातृभूमीच्या रक्षणासाठी जवान देऊन आपली असीम राष्ट्रभक्ती जपली आहे. परिसरात देशसेवेसाठी जवान देणारे गाव म्हणून प्रसिद्ध असलेल्या या छोट्याशा गावाने आतापर्यंत ४० च्या वर जवान देशकार्यासाठी दिले आहे. एकीकडे संपूर्ण देशभर स्वातंत्र्य दिनाचा उत्साह सुरू असताना अकोलादेव या तीन ते चार हजार लोकसंख्येच्या गावाचे हे ओतपोत देशप्रेम नजरेआड करुन चालणार नाही. अकोलादेव हे गाव आज हजारो युवकांची सैन्य भरतीची प्रेरणा बनू पाहत आहे.
येथील दशरथ जाधव हे गावातील पहिले सैनिक. ते १९६८ मध्ये सैन्यात भरती झाले. माजी सैनिक दशरथ जाधव यांची प्रेरणा घेऊन दरवर्षी एक - दोन युवक सैन्यात भरती होऊ लागले. आतापर्यंत जवळपास ६० जणांनी हा देशसेवेचा वसा स्वीकारला आहे. त्यापैकी आठ सैनिक निवृत्त होऊन गावाकडे परत आले आहे. गावातील सर्व माजी सैनिक हे नवयुवकांना सैनिकी जीवनातील अनुभव सांगून त्यांना सैनिकी नोकरीची प्रेरणा देत आहे.
आतापर्यंत दशरथ सवडे, विष्णू सवडे, भास्कर सवडे, कौतिक सवडे, राजीव छडीदार, बद्री सवडे, डिगांबर सवडे हे देशसेवा बजावून सेवानिवृत्त झाले आहे. तर लक्ष्मण सवडे, अंकुश सवडे, विठ्ठल दरेकर, मोहन जाधव, संदीप सवडे, योगेश सवडे, भरत भारती, नारायण कदम, संतोष माळी, कृष्णा सवडे, विठ्ठल सवडे, मोहन सवडे, अमोल सवडे, स्वप्नील सवडे, दत्तात्रय सवडे, ईश्वर सवडे, नीलेश सवडे, राजेंद्र शेळके, सोमीनाथ आटपळे, नितेश सवडे आदी अनेक सेवा बजावत आहेत. स्वातंत्र्य दिन असो की प्रजासत्ताक दिन अकोलादेव या सैनिकी गावात आबालवृद्धांमध्ये राष्ट्रप्रेम उफाळत असते. देशासाठी वीर जवान देणारे हे छोटेसे गाव आज जाफराबाद तालुक्यातच नव्हे तर संपूर्ण जालना जिल्ह्यात ज्वलंत देशभक्तीचा एक स्त्रोत बनले आहे.
पळसखेड्यातून देशसेवेसाठी १८ जवान
जालना : भोकरदन तालुक्यातील पळसखेडा येथील १८ युवक हे भारतीय सैन्य दलात देशाच्या विविध भागांत सेवा बजावत आहेत. या गावाची लोकसंख्या ही केवळ ८८९ आहे. मात्र देशप्रेमाची आवड असलेले गावातील अनेक तरुण सैनभरतीची तयारी करतात.ग्रामस्थांचा प्रमुख व्यवसाय शेती आहे.गावात विविध सुविधांचा अभाव असताना गावकºयांचे देशप्रेम वाखाणण्याजोगे आहे. गावातील दोन तरुण सैन्यात होते. त्यांचाच आदर्श डोळ्यासमोर ठेवून आत्तापर्यत १८ सैनिक देशसेवा बजावत आहेत. यात पंडित खरात, विष्णू रगडे, लिंबाजी खरात, विजय खरात, सतीश खरात, किशोर खरात, योगेश खरात, मनोज खरात, रामेश्वर खरात, विनोद खरात, समाधान खरात, ईश्वर खरात, प्रल्हाद खरात, आजिनाथ खरात, प्रमोद खरात, सुनील खरात असे १८ जवान देशसेवेत आहे. यातील दोन जवान देशसेवा पूर्ण करुन सेवानिवृत्त झाले आहेत.यांचा आदर्श इतरांनी घेण्याची गरज निर्माण झाली आहे.