रोहित्र जळाल्याने दोन महिन्यांपासून गाव अंधारात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2021 04:30 AM2021-03-05T04:30:23+5:302021-03-05T04:30:23+5:30
वडोद तांगडा : तालुक्यातील वडोद तांगडा येथील सिंगल फेजचे रोहित्र दोन महिन्यांपासून जळाले आहेत. त्यामुळे गाव अंधारात असून, ...
वडोद तांगडा : तालुक्यातील वडोद तांगडा येथील सिंगल फेजचे रोहित्र दोन महिन्यांपासून जळाले आहेत. त्यामुळे गाव अंधारात असून, ग्रामस्थांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
वडोद तांगडा या गावाची लोकसंख्या सात हजारांच्या जवळपास आहे. गावाला सहा गट्टूने वीज पुरवठा केला जातो. गावात मागील काही दिवसांपासून रोहित्र जळण्याचे प्रमाण वाढले आहे. याबाबत महावितरणकडे वारंवार तक्रारी करण्यात आल्या; परंतु याकडे दुर्लक्ष केले गेले. दोन महिन्यांपूर्वीच गावातील रोहित्र जळाले आहे. यामुळे गामस्थांना अनेक अडचणींना समोरे जावे लागत आहे. पाणी पुरवठ्यावरही परिणाम झाला असून, नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. वारंवार रोहित्र जळत असल्याने काही महिन्यांपूर्वीच गावात नवीन रोहित्र बसविण्यात आले होते; परंतु हे रोहित्र जळाल्याने ग्रामस्थांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. सध्या ऊन तापत आहे. त्यातच गावाचा वीज पुरवठा खंडित आहे. फॅन, कुलर ही उपकरणे बंद असल्याने ग्रामस्थ गरमीने हैराण झाले आहेत. सतत रोहित्र जळत असल्याने ग्रामस्थांना दहा ते बारा दिवस अंधारात रहावे लागत आहे. याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे. मागणी मान्य न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा सरपंच मनिषा वास्कर, उपसरपंच नाना तांगडे, नारायण तांगडे यांनी दिला आहे.