निकृष्ट रस्त्याचे काम ग्रामस्थांनी थांबविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 07:56 AM2021-02-05T07:56:49+5:302021-02-05T07:56:49+5:30
पारध : ग्रामस्थांच्या रेट्यानंतर सुरू झालेले पारध- वालसावंगी या रस्त्याचे काम पारध ग्रामस्थांनी रविवारी थांबविले. संबंधित ठेकेदार या रस्त्याचे ...
पारध : ग्रामस्थांच्या रेट्यानंतर सुरू झालेले पारध- वालसावंगी या रस्त्याचे काम पारध ग्रामस्थांनी रविवारी थांबविले. संबंधित ठेकेदार या रस्त्याचे काम थातूरमातूर करीत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
पारध ते वालसावंगी या रस्त्याची मोठी दुरवस्था झाली आहे. या रस्त्यावरून वाहने चालविताना चालकांना कसरत करावी लागत असून, अपघाताचाही धोका वाढला आहे. केवळ सात किलोमीटरचे अंतर पूर्ण करण्यासाठी अर्ध्या तासाहून अधिक वेळ लागत आहे. शिवाय वाहनांचे होणारे नुकसान आणि चालक, प्रवाशांना जडणारे हाडांचे आजार वेगळेच आहेत. वाढलेले रस्ता अपघात पाहता या रस्त्याची तातडीने दुरूस्ती करावी, अशी मागणी या भागातील ग्रामस्थांनी लावून धरली होती. ग्रामस्थांच्या रेट्यानंतर बांधकाम विभागाने गुरूवारपासून या रस्त्याच्या कामाला सुरुवात केली होती. परंतु, होणारे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचे पारध व परिसरातील ग्रामस्थांच्या लक्षात आले. त्यानंतर संतप्त ग्रामस्थांनी प्रत्यक्ष कामावर धाव घेऊन ते काम बंद पाडले. जोपर्यंत दर्जेदार काम होणार नाही, तोपर्यंत रस्त्याचे काम सुरू होऊ देणार नसल्याची भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे.
अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष
ग्रामस्थांनी अनेकवेळा पाठपुरावा केल्यानंतर या रस्त्याचे काम सुरू झाले आहे. परंतु, होणारे काम निकृष्ट दर्जाचे होत आहे. या भागातील ग्रामस्थांसाठी हा रस्ता महत्त्वाचा असून, जोपर्यंत अधिकारी प्रत्यक्ष कामाची पाहणी करून दर्जेदार कामे करून घेत नाहीत, तोपर्यंत रस्त्याचे काम सुरू करू देणार नाही, अशी भूमिका शेखर श्रीवास्तव, समाधान डाेईफोडे, गजानन देशमुख, बबलू तेलंग्रे, अक्षय लोखंडे आदींनी घेतली होती.
फोटो