ज्येष्ठांच्या लसीकरण नोंदणीला तांत्रिक समस्यांचा ‘व्हायरस’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:57 AM2021-03-04T04:57:37+5:302021-03-04T04:57:37+5:30
जालना : ज्येष्ठांना कोरोनाची लस देण्यापूर्वी कोविन ॲपवर केल्या जाणाऱ्या ऑनलाइन नोंदणीतील तांत्रिक समस्यांचा ‘व्हायरस’ दुसऱ्या दिवशी मंगळवारीही कायम ...
जालना : ज्येष्ठांना कोरोनाची लस देण्यापूर्वी कोविन ॲपवर केल्या जाणाऱ्या ऑनलाइन नोंदणीतील तांत्रिक समस्यांचा ‘व्हायरस’ दुसऱ्या दिवशी मंगळवारीही कायम होता. या तांत्रिक समस्यांचा सामना करीतच दिवसभरात जिल्ह्यातील दहा केंद्रांवर १४६ ज्येष्ठांना कोरोनाची लस देण्यात आली, तर विविध आजार असलेल्या ४५ ते ५९ वर्षे वयोगटातील ४६ जणांनाही कोरोनाची लस देण्यात आली.
कोरोना लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात सोमवारपासून ६० वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना लस देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. पहिल्या दिवशी सोमवारी ज्येष्ठांची ऑनलाइन नोंदणी करण्यासाठी तांत्रिक समस्या येत होत्या. त्यामुळे दिवसभरात केवळ १८ ज्येष्ठ नागरिकांना कोरोनाची लस देण्यात आली, तर विविध आजार असलेल्या ४५ ते ५९ वर्षे वयोगटातील दोघांना लस देण्यात आली होती. तांत्रिक समस्या दूर करण्याबाबत आरोग्य विभागाच्या वतीने वरिष्ठांना सूचित करण्यात आले होते; परंतु दुसऱ्या दिवशी मंगळवारी सकाळपासूनच कोविन ॲपवरील ऑनलाइन नाेंदणीवेळी येणाऱ्या तांत्रिक समस्या कायम होत्या. सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास ज्येष्ठ नागरिकांसह विविध आजार असलेल्या नागरिकांना कोरोनाची लस देण्यास सुरुवात करण्यात आली; परंतु दुपारी १२.३० वाजेपर्यंत केवळ नऊ ते दहा जणांना लस देण्यात आली होती. सकाळपासून उभारून कंटाळलेल्या अनेकांनी लसीकरण केंद्रातून काढता पाय घेतला.
कोविड रुग्णालयाचे प्रमुख डॉ. संजय जगताप यांच्यासह त्यांचे सहकारी ॲपवरील ऑनलाइन नोंदणी करण्यासाठी प्रयत्न करीत होते. त्याचवेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अर्चना भोसले यांनीही लसीकरण केंद्राला भेट देऊन पाहणी केली, तसेच येणाऱ्या समस्या जाणून घेत बाहेर होणाऱ्या गर्दीवर नियंत्रण ठेवत सुरक्षित अंतराचे पालन करण्याच्या सूचना दिल्या. दुपारनंतर तांत्रिक समस्या कमी झाल्या आणि लसीकरणाला वेग आला. जिल्हा रुग्णालयातील लसीकरण केंद्रात मंगळवारी दिवसभरात ४० ज्येष्ठ नागरिकांना लस देण्यात आली, तर विविध आजार असलेल्या ४५ ते ५९ वर्षे वयोगटातील १७ जणांनाही कोरोना लसीचा पहिला डोस देण्यात आला.
एकूण ४४५ डोस
जिल्ह्यात मंगळवारी दिवसभरात एकूण ४४५ जणांना कोरोना लसीचा डोस देण्यात आला. यात आरोग्य विभागातील १८२ जणांना, ७१ फ्रंटलाइन वर्कर, विविध आजार असलेल्या ४५ ते ५९ वयोगटातील ४६ जण, ६० वर्षांवरील १४६ जणांना लस देण्यात आली. यात पहिला डोस २९० जणांना, तर दुसरा डोस १५५ जणांना देण्यात आला.
तीन तासांचे वेटिंग
शहरातील संभाजीनगर भागातील गुंफाबाई लहाने, के.बी. लहाने हे दोन ज्येष्ठ नागरिक मंगळवारी सकाळी ९.३० वाजण्याच्या सुमारास लसीकरणासाठी केंद्रात दाखल झाले होते; परंतु तांत्रिक समस्यांमुळे त्यांचा नंबर १२.३० वाजण्याच्या सुमारास आला. त्यांना लस दिल्यानंतर दक्षतेसाठी म्हणून अर्धा तास रुग्णालयातील कक्षात ठेवण्यात आले.
लसीकरण सुरक्षित
लसीकरणात नावनोंदणीसाठी ऑनलाइन अडचणी येत असल्याने काही काळ वाट पाहावी लागली. ऑनलाइन नोंदणी झाल्यानंतर मी कोरोना लसीचा पहिला डोस घेतला असून, दुसरा डोसही घेणार असल्याचे सुरेश नाईक यांनी सांगितले.
वरिष्ठांना माहिती दिली
सर्वत्र एकाच वेळी लसीकरण केले जात असल्याने लसीकरणाच्या सर्व्हरवर लोड येत असून, नोंदणीसाठी तांत्रिक समस्या येत आहेत. या तांत्रिक समस्यांची माहिती वरिष्ठांना दिली असून, ही समस्या लवकरच मार्गी निघेल. जिल्ह्यातील अधिकाधिक ज्येष्ठ नागरिकांनी कोरोनाची लस घ्यावी.
-डॉ. अर्चना भोसले,
जिल्हा शल्यचिकित्सक
केंद्रावर झालेले लसीकरण
केंद्र विविध आजार असलेले ६० वर्षांवरील ज्येष्ठ
जिल्हा रुग्णालय- १७ - ४०
बदनापूर ग्रामीण रुग्णालय- ०० - ००
घनसावंगी रुग्णालय- ०० - ००
मंठा रुग्णालय- ०१ - ००
परतूर रुग्णालय - ०२ - ०४
भोकरदन रुग्णालय- ०० - ०४
जाफराबाद रुग्णालय- ०५ - ०५
अंबड रुग्णालय- ०३ - १३
दीपक रुग्णालय - १८ - ६०
गणपती नेत्रालय- ०० - २०