मतदार संख्या १५ लाखांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2019 11:54 PM2019-10-12T23:54:40+5:302019-10-12T23:55:00+5:30

जिल्ह्यातील मतदारांची संख्या १५ लाख ५५ हजार ७५३ वर गेली आहे.

Voter turnout at 15 lakhs | मतदार संख्या १५ लाखांवर

मतदार संख्या १५ लाखांवर

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : विधानसभा निवडणूक रणधुमाळीत प्रचाराला वेग आला असून, उमेदवारांच्या शहरी, ग्रामीण भागातील फेऱ्या वाढल्या आहेत. राजकीय उमेदवार, कार्यकर्त्यांसह प्रशासकीय यंत्रणाही निवडणुकीसाठी कामाला लागली आहे. अंतिम यादीत जिल्ह्यातील मतदारांची संख्या १५ लाख ५५ हजार ७५३ वर गेली आहे. यात ८ लाखांवर पुरूष तर ७ लाखांवर महिला मतदारांचा समावेश आहे.
विधानसभा निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली आहे. निवडणूक विभागाने अधिकाधिक मतदारांच्या नोंदी करण्यासाठी उपाययोजना राबविण्यात आल्या होत्या. यंत्रणेच्या प्रयत्नानंतर अंतिम मतदार यादीत जिल्ह्यातील एकूण मतदारांची संख्या १५ लाख ५५ हजार ७५३ वर गेली आहे. यात ८ लाख १७ हजार ७३५ पुरूष व ७ लाख ३८ हजार १६ मतदारांचा समावेश आहे. तर दोन तृतीय पंथीय मतदारांचीही नोंदणी करण्यात आली आहे.
गत विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात १३ लाख ८९ हजार ३३ इतके मतदार होते. यात ७ लाख ३६ हजार ६५२ पुरूष तर ६ लाख ५२ हजार ३८१ महिला मतदारांचा समावेश होता.
मागील पाच वर्षात निवडणूक विभागाच्या वतीने राबविण्यात आलेल्या कार्यक्रमातून ही मतदारांची संख्या १५ लाख ५५ हजारांवर गेली असून, गत निवडणुकीच्या तुलनेत १ लाख ६६ हजार ७२० मतदार वाढले आहेत. युवकांच्या मतदानात वाढ झाली असून, युवकांचे हे मतदान आपल्याकडे खेचण्यासाठी राजकीय पक्षांनी लक्ष केंद्रित केले आहे.
प्रमुख पक्षाच्या उमेदवारांसह अपक्षांनीही निवडणूक रणधुमाळीत प्रचार यंत्रणा जोमात राबविली आहे. सत्ताधाऱ्यांनी केलेली विकास कामे तर विरोधकांनी मतदार संघातील प्रश्नांना हात घालून आपल्या विजयासाठी रणनीती आखली आहे. राजकीय पक्षाबरोबरच प्रशासकीय यंत्रणेचे कामकाजही अहोरात्रपणे सुरू असल्याचे चित्र दिसून येत आहे. पोलीस यंत्रणाही सज्ज आहे.
८१ हजार पुरूष तर ७३ हजार महिला मतदारांचा समावेश
जिल्ह्यात एकूण १५ लाख ५५ हजार ७५३ मतदार आहेत. यात परतूर मतदार संघात १ लाख ५५ हजार ६३७ पुरूष, १ लाख ४० हजार ५२९ महिला मतदार आहेत. घनसावंगी मतदार संघात १ लाख ६२ हजार ५०२ पुरूष तर १ लाख ५० हजार २२१ महिला मतदार आहेत. जालना विधानसभा मतदार संघात १ लाख ७७ हजार १९६ पुरूष तर १ लाख ५६ हजार १५१ महिला मतदारांचा समावेश आहे. तर दोन तृतीयपंथीय मतदारांची नोंदही करण्यात आली आहे.
बदनापूर मतदार संघात १ लाख ६१ हजार ५६६ पुरूष तर १ लाख ४४ हजार ८७५ महिला मतदार आहेत. तर भोकरदन विधानसभा मतदर संघात १ लाख ६० हजार ८३४ पुरूष व १ लाख ४४ हजार ८७५ महिला मतदारांचा समावेश आहे. विशेषत: गत विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत या विधानसभा निवडणुकीत युवा मतदारांची संख्या वाढली आहे. युवकांचे वाढलेले मतदान आपल्याच पारड्यात पाडण्यासाठी राजकीय पक्षांनी प्रयत्न चालविले आहेत.

Web Title: Voter turnout at 15 lakhs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.