वाट पाहिली पण झेडपी शिक्षक देईना; अखेर ३ दिवसांत २२ विद्यार्थ्यांनी काढला टीसी
By शिवाजी कदम | Published: July 17, 2023 07:22 PM2023-07-17T19:22:48+5:302023-07-17T19:28:31+5:30
केहाळ वडगाव येथे शिक्षणाची लागली वाट; हतबल विद्यार्थी अन्य शाळेत गेल्याने आठवीचा वर्ग पडला बंद
- अमोल राऊत
तळणी : केहाळ वडगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षकांची पदे रिक्त असून ही पदे भरण्याच्या मागणीकडे दुर्लक्ष करणाऱ्या शिक्षण विभागाच्या कारभाराला कंटाळून पालकांनी विद्यार्थ्यांचा दाखला काढल्यामुळे आठवीचा वर्ग बंद झाला आहे. येत्या काही दिवसांत इतरही वर्ग बंद होण्याच्या मार्गावर आहेत. शिक्षण विभागाच्या अनास्थेमुळे विद्यार्थ्यांना इतर शाळांची वाट धरावी लागली आहे.
मंठा तालुक्यातील जयपूर केंद्रांतर्गत केहाळ वडगाव येथे १ ते ८ पर्यंत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आहे. या शाळेत १०० विद्यार्थी शिक्षण घेत असताना तीन शिक्षक कार्यरत आहेत. अपुऱ्या शिक्षकांमुळे विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी पालकांनी शिक्षक देण्याची वारंवार मागणी केली. मात्र, याकडे शिक्षण विभागाकडून दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे संतप्त पालकांनी आपल्या मुलांच्या टीसी काढून इतरत्र शाळेत प्रवेश घेतला आहे. यामुळे विद्यार्थी संख्या घसरून ६० वर आली आहे. आठवीच्या २२ विद्यार्थ्यांनी दाखला काढून जयपूर येथील शाळेत प्रवेश घेतल्याने आठवीचा वर्ग बंद झाला आहे. ग्रामीण भागातील तळणी, किर्ला, उस्वद व जयपूर केंद्रातील शाळेत शिक्षकांची पदे रिक्त असून पटसंख्येनुसार शिक्षक देण्याची मागणी होत आहे.
इतर शाळांमध्ये प्रवेश
केहाळ वडगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील सातवीत उत्तीर्ण झालेले विद्यार्थी आठवीच्या वर्गासाठी पात्र झाले. मात्र, अपुऱ्या शिक्षकांमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी २२ विद्यार्थ्यांनी टीसी काढून इतरत्र प्रवेश केल्यामुळे आठवीचा वर्ग बंद झाल्याचे पालक सुरेश दवणे यांनी सांगितले.
पदवीधर शिक्षक मिळेना
केहाळ वडगावच्या शाळेत पदवीधर शिक्षक पद रिक्त असून शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी पालकांनी विद्यार्थ्यांना इतरत्र प्रवेश दिल्यामुळे आठवीचा वर्ग जवळपास बंद पडण्याच्या मार्गावर आहे. यापूर्वीच रिक्त पदांबाबत माहिती वरिष्ठांना दिली आहे.
- ए.एम. चव्हाण, केंद्रप्रमुख, जयपूर