वक्फचा जमीन घोटाळा कोट्यवधींचा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2018 12:42 AM2018-09-30T00:42:20+5:302018-09-30T00:42:53+5:30
: राज्यातील वक्फ बोर्डाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर जमिन घोटाळा झाल्याचे तपासांती उघड झाले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : राज्यातील वक्फ बोर्डाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर जमिन घोटाळा झाल्याचे तपासांती उघड झाले आहे. हा गैरव्यवहार चव्हाट्यावर आणणारे जालन्यातील सामाजिक कार्यकर्ते तथा मुस्लिम ओबीसी संघटनेचे अध्यक्ष शब्बीर अन्सारी हे असून येत्या आठवडाभरात दोषी आढळलेल्या वक्फ बोर्डाच्या आजी व माजी सदस्यांवर आता चौकशीनंतर आठवड्याभरात गुन्हा दाखल न झाल्यास तीव्र आंदोलन आणि न्यायालयाचे दरवाजे ठोठावणार असल्याचे शब्बीर अन्सारी यांनी सांगितले.
गेल्या पन्नास वर्षांपासून वक्फ बोर्डाच्या राज्यातील हजारो एकर जमिनी चुकीच्या पध्दतीने नियमबाह्यरीत्या विक्री झाल्या आहेत. राज्यात वक्फची जवळपास ९३ हजार एक जमिन असून जवळपास १ लाख स्थावर मालमत्ता आहे. गेल्या वर्षभरापासून आपण तहरिफ औकाफ या संस्थेच्या माध्यमातून या घोटाळ्याची पाळेमुळे खोदण्याच्या प्रकरणात लक्ष घातले. लोकांच्या मागणीस्तव आपण या प्रकरणात लक्ष घातल्याचे अन्सारी यांनी लोकमतशी बोलतांना सांगितले.
साधारणपणे वर्षभरापूर्वी आपण राज्याच्या प्रधान सचिवांकडे तसेच मुख्यमंत्र्यांकडे तक्रारी केल्या. या संदर्भातील आवश्यक असणारे पुरावे सादर केले.
जालन्यात तीन हजार एकर जमीन
जालना शहर व परिसरात जवळपास तीन हजार एकर जमीन ही वक्फ बोर्डाची आहे. यावर अनेकांनी अतिक्रमण करून ती चुकीच्या पध्दतीने नावावर करून घेतली आहे. यामध्ये सविस्तर चौकशी आणि सरकारने कारवाई केल्यास मोठ्या प्रमाणावर घोटाळा समोर येऊन वक्फ बोर्डाला यातून मोठे उत्पन्न मिळू शकते. परंतु यासाठी मोठी हिंमत दाखवावी लागणार आहे.