बाजारात फिरताय... दागिने, मोबाईल सांभाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2021 04:27 AM2021-09-13T04:27:56+5:302021-09-13T04:27:56+5:30
माहोरा : जाफराबाद तालुक्यातील माहोरा येथील आठवडी बाजारात दागिने, मोबाईल चोरणाऱ्यांची टोळी चांगलीच सक्रिय झाली आहे. त्यामुळे येथील आठवडी ...
माहोरा : जाफराबाद तालुक्यातील माहोरा येथील आठवडी बाजारात दागिने, मोबाईल चोरणाऱ्यांची टोळी चांगलीच सक्रिय झाली आहे. त्यामुळे येथील आठवडी बाजारात भाजीपाल्यासह इतर साहित्य खरेदी करताना अधिकची काळजी घ्यावी लागणार आहे.
जाफराबाद तालुक्यातील माहोरा येथे आठवड्यातील मोठ्या बाजारांपैकी एक असलेला बाजार शुक्रवारी भरतो. या बाजारात लाखो रुपयांची उलाढाल होते. त्यात गणेशोत्सव, महालक्ष्मी सणानिमित्त शुक्रवारच्या बाजारात मोठी गर्दी झाली होती. या गर्दीचा फायदा घेत गीता औटी या महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत चोरट्यांनी हातोहात लंपास केली. पोत हिसकावल्यानंतर त्या महिलेने आरडाओरड केली. परंतु, चोरटा नागरिकांच्या हाती लागला नाही. २७ ऑगस्ट या बैलपोळा सणाच्या बाजारातही अनेक नागरिकांचे मोबाईल चोरट्यांनी हातोहात लांबविले आहेत. मोबाईल, दागिने चोरणाऱ्या टोळीत महिला, पुरुषांसह लहान बालकांचा समावेश असल्याची चर्चा सुरू आहे. माहोरा येथील आठवडी बाजारातून सतत मोबाईलसह इतर साहित्यही चोरी जात आहे. त्यात आता महिलांचे दागिने लंपास केले जात असल्याने संताप व्यक्त केला जात आहे. पोलीस प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देवून मोबाईल, दागिने चोरणाऱ्यांचा बंदोबस्त करावा, आठवडी बाजारातील गस्त वाढवावी, अशी मागणी सरपंच वैशाली कासोद, उपसरपंच गजानन साळोक व इतरांनी केली आहे.
कोट
आठवडी बाजारात जाताना महिलांनी मौल्यवान दागिने सोबत नेवू नयेत. स्वत:कडील मोबाईल सुरक्षित ठेवावा. पोलीस प्रशासनाच्या वतीने आठवडी बाजारात नियमित बंदोबस्त लावला जाईल. शिवाय इतर वेळीही गस्त ठेवली जाईल. नागरिकांनीही पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे.
सहाने, बीट जमादार