सत्तेत असताना इव्हीएम विश्वसनीय होते का?- देवेंद्र फडणवीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2019 12:54 AM2019-08-28T00:54:48+5:302019-08-28T00:55:15+5:30
इव्हीएममध्ये विरोधकांना दोष कसा दिसतो, असा सवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी अंबड येथे आयोजित जाहीर सभेत केला
लोकमत न्यूज नेटवर्क
अंबड : केंद्रासह महाराष्ट्रात काँग्रेस तसेच राष्ट्रवादी काँग्रेसने दहा वर्षे सत्ता भोगली. त्यावेळच्या निवडणुका या देखील इव्हीएमवरच झाल्या होत्या. त्यामुळे इव्हीएम चांगले होते आणि आता आम्हाला जनता विजयी करत आहे, तर इव्हीएममध्ये विरोधकांना दोष कसा दिसतो, असा सवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी अंबड येथे आयोजित जाहीर सभेत केला. तसेच काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे पंधरा वर्ष आणि आमचे पाच वर्ष या काळातील जो विकास आम्ही केला त्यावर खुली चर्चा झाल्यास ‘दूध का दूध आणि पानी का पानी’ होईल, असे आव्हानही विरोधकांना मुख्यमंत्र्यांनी दिले.
अंबड येथील दत्ताजी भाले मैदानावर महाजनादेश यात्रेचे जोरदार स्वागत करण्यात आले. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे पालकमंत्री बबनराव लोणीकर, भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. संतोष दानवे, भाजपाचे उपप्रदेशाध्यक्ष आ. सुजितसिंह ठाकूर, आ. नारायण कुचे, नगराध्यक्षा संगीता कुचे, शीतल कुचे, जिल्हा उपाध्यक्ष दीपकसिंग ठाकूर, शहराध्यक्ष संदीप खरात, नगरसेवक सौरभ कुलकर्णी आदींची प्रमुख उपस्थिती होती.
पुढे बोलताना फडणवीस यांनी विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला. शेतकऱ्यांच्या मदतीसाठी आघाडी सरकारने केवळ २० हजार कोटी रूपये देऊ केले होते. ते आम्ही ५० हजार कोटी रूपये दिले. यासह दुष्काळी अनुदान, बोंड अळीमुळे झालेल्या नुकसानीचे अनुदान इ. मदत ही वेगळी असे त्यांनी नमूद केले. मराठवाड्याच्या पाचवीला दुष्काळ पुजलेला आहे, तो भविष्यात भूतकाळ होईल, असे सांगून सिंचन, पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष्य मिटविणयसाठी वॉटरग्रीड प्रकल्पासाठी २० हजार कोटी रूपयांची तरतूद केली आहे. तसेच समुद्राचे १६७ टीमएमसी पाणी गोदावरीत आणून ते पाईपलाईने मराठवाड्यात वितरित करण्याची योजना आहे.
गेल्या पाचवर्षात १८६ पाणी योजनांची कामे पूर्ण केली असून, रस्ते, आरोग्य, शिक्षण तसेच राष्ट्रीय महामार्ग, समृध्दी महामार्ग आदी विकास कामांमुळे राज्याचा चेहरामोहरा बदलल्याचा दावा फडणवीस यांनी केला.
जालन्यात आयसीटी ही प्रतिष्ठित शिक्षण संस्था स्थापन करण्यासाठी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी जे प्रयत्न केले, त्यामुळे उच्च शिक्षणाची मोठी संधी मराठवाड्यातील विद्यार्थ्यांना झाल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. यावेळी रावसाहेब दानवे यांनी देखील विरोधकांवर टीकेचे प्रहार करून गेल्या पाचवर्षात जितका विकास झाला तितका काँग्रेसने कधीच केला नसल्याचे सांगितले. जालना ते अंबड रस्त्यासाठी आम्ही ३५० कोटी रूपये मंजूर केल्यानेच अपघातांचे प्रमाण कमी होऊन प्रवास गतिमान होण्यास मदत झाल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी आ. नारायण कुचे यांनी गेल्या पंधरा वर्षात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने अंबडला पाणीपुरवठा योजनाही केली नाही. आम्ही पाचवर्षात चौफेर विकास साधला. या कामी वरिष्ठ नेत्यांची साथ मिळाल्यानेच हे शक्य झाल्याचे कुचे यांनी सांगितले.
अंबड : गाडीतूनच हारतुरे स्वीकारल्याने कार्यकर्त्यांचा हिरमोड
गेवराई येथून मुख्यमंत्री सभा आटोपून अंबडकडे जात होते. त्यावेळी रस्त्याच्या दुतर्फा भाजपच्या नेत्यांनी त्यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी केली होती. मुख्यमंत्री फडणवीस हे गाडीच्या खाली उतरतील, अशी आशा होती, परंतु ती फोल ठरली. त्यांनी गाडीतून हात उंचावून कार्यकर्त्यांना अभिवादन केले.
जे त्यांच्या गाडीजवळ होते, त्यांचा सत्कार त्यांनी घेतला. यामुळे पदाधिकारी, कार्यर्त्यांचा हिरमोड झाला. यावेळी भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष किरण खरात, अंबड तालुका उपाध्यक्ष पांडुरंग खरात, सर्कलप्रमुख नजीर शहा, अनिरुद्ध झिंजुर्डे, सय्यद गफूर आदींची उपस्थिती होती.