वाहते हे पाणी..न देखवे डोळा...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2018 01:17 AM2018-06-21T01:17:43+5:302018-06-21T01:17:43+5:30
सहा ते सात वर्षापूर्वी जालनेकरांना हंडाभर पाणी मिळावे म्हणून जो जिवाचा आटापिटा करावा लागला तो जालनेकर नागरिक विशेष करून महिला अद्यापही विसरलेल्या नाहीत. मात्र, आज याच्या नेमकी उलट परिस्थिती निर्माण झाली आहे. अंबड येथून शुध्द होऊन येणारे पाणी चक्क व्हॉल्व्ह फुटल्याने वाया जात असल्याचे पाहून प्रत्येक जालनेकरांच्या डोळ्यात पाणी न आल्यासच नवल अशी अवस्था दुरूस्ती अभावी झाल्याचे वास्तव आहे.
संजय देशमुख ।
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : सहा ते सात वर्षापूर्वी जालनेकरांना हंडाभर पाणी मिळावे म्हणून जो जिवाचा आटापिटा करावा लागला तो जालनेकर नागरिक विशेष करून महिला अद्यापही विसरलेल्या नाहीत. मात्र, आज याच्या नेमकी उलट परिस्थिती निर्माण झाली आहे. अंबड येथून शुध्द होऊन येणारे पाणी चक्क व्हॉल्व्ह फुटल्याने वाया जात असल्याचे पाहून प्रत्येक जालनेकरांच्या डोळ्यात पाणी न आल्यासच नवल अशी अवस्था दुरूस्ती अभावी झाल्याचे वास्तव आहे.
जालना शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन तत्कालीन आ. कैलास गोरंट्याल यांनी स्वपक्षाचे सरकार असताना त्यांच्याशी दोन हात करून पैठण जालना पाणीपुरवठा योजना खेचून आणली. त्यासाठी त्यांनी कोणकोणती शक्कल लढवून अडचणींना तोंड दिले, हे जालनेकर विसरलेले नाहीत. ही पाणीपुरवठा योजना होण्यासाठी जवळपास २५० कोटी रूपयांचा खर्च करण्यात आला. ही योजना मुळात ज्यावेळी नगराध्यक्ष भास्कर अंबेकर होते, त्यावेळी त्यांनी जालना पालिकेत ठराव घेऊन ती पुढे रेटली. मात्र, सत्तांतर झाल्यावर माजी आ. कैलास गोरंट्याल यांनी जोपर्यंत ही योजना पूर्ण होणार नाही, तो पर्यंत गळ्यात पुष्पहार न घालण्याची प्रतिज्ञा केली होती, आणि ती त्यांनी पूर्णही केली. भास्कर अंबेकरांप्रमोणच राज्यमंत्री अर्जुन खोतकरांनी देखील त्यावेळी ही योजना पूर्णत्वास नेण्यासाठी औरंगाबाद येथील खंडपीठात याचिका दाखल केली होती. एकूणच या योजनेच्या श्रेयवादावरून आजही चर्चा रंगतात ही बाब वेगळी. ही योजना व्हावी म्हणून मराठवाडा जनता विकास परिषदेच्या माध्यमातून सामाजिक कार्यकर्ते साईनाथ चिन्नदोरे यांनी देखिल या योजनेची लोकवर्गणी भरण्यासाठी भीकमांगो आंदोलन करून औरंगाबाद उच्च न्यायालयात याचिकाही दाखल केली होती. त्यासाठी अॅड. प्रदीप देशमुख यांनी हा लढा निशुल्क लढला होता. एकूणच आता तुम्ही म्हणाल पाणी वाया जाण्याच्या मुद्यावरून एवढा इतिहास कशासाठी सांगितला, परंतु एवढ्या कष्टाने आणलेल्या या योजनेला किरकोळ दूरूस्ती अभावी जर खीळ बसत असेल तर, ही गंभीर बाब आहे. अन्य विकास कामाच्या नावावर पालिका कोट्यवधी रूपये खर्च करत आहे. आणि आजच्या तंत्रयुगात जालना पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाला जर ७०० व्यासाचा व्हॉल्व्ह मिळत नसेल तर हे दुर्दैवच म्हणावे लागेल. संत तुकाराम महाराजांनी एका अभंगात बुडती हे जन न देखवे डोळा... येतो कळवळा म्हणोणी. तशी अवस्था आज या गळतीची झाली आहे.
आमच्याकडून युध्दपातळीवर प्रयत्न सुरू
पाईपलाईन फुटल्याने त्यातून हजारो लिटर पाणी वाया जात आहे. हे पाणी मोतीतलावात चर खोदून सोडले आहे. त्यामुळे मोतीतलावाची पाणीपातळी उन्हाळ्यातही कायम होती. ही पाईपलाईन दुरूस्त करण्यासाठी आमचे युध्द पातळीवर प्रयत्न सुरू असल्याची माहिती मुख्याधिकारी संतोष खांडेकर यांनी लोकमतशी बोलताना दिली. येत्या आठ दिवसात ही दुरूस्ती हाईल अशी आशा असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.