कचरा व्यवस्थापन काळाची गरज - डॉ. तावरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2021 04:33 AM2021-09-23T04:33:32+5:302021-09-23T04:33:32+5:30

जालना : कचऱ्यामुळे पर्यावरणाला मोठ्या प्रमाणात धोका निर्माण झालेला असून, त्या अनुषंगाने कचरा व्यवस्थापन ही काळाची गरज बनली ...

Waste Management Needs Time - Dr. Taware | कचरा व्यवस्थापन काळाची गरज - डॉ. तावरे

कचरा व्यवस्थापन काळाची गरज - डॉ. तावरे

googlenewsNext

जालना : कचऱ्यामुळे पर्यावरणाला मोठ्या प्रमाणात धोका निर्माण झालेला असून, त्या अनुषंगाने कचरा व्यवस्थापन ही काळाची गरज बनली आहे, असे प्रतिपादन पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे माजी सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ. प्रभाकर तावरे यांनी येथे आयोजित कार्यशाळेत केले.

ग्रीन आर्मी आणि सृष्टी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी अंकुशराव टोपे महाविद्यालयात ‘कचरा वर्गीकरण आणि व्यवस्थापन’ या विषयावर आयोजित पर्यावरण कार्यशाळेत डॉ. तावरे हे प्रमुख व्याख्याते म्हणून बोलत होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून अंकुशराव टोपे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. आर. गायकवाड, उपप्राचार्य रमेश भुतेकर, जेईएस महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जवाहर काबरा यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी डॉ. प्रभाकर तावरे यांनी कचरा वर्गीकरण, त्याची आवश्यकता, उपयोजन याविषयी चित्रफितीच्या माध्यमातून विद्यार्थी आणि उपस्थितांना सखोल मार्गदर्शन केले. प्रत्येकाने पर्यावरण संतुलनासाठी आपापल्या परीने प्रयत्न केले पाहिजेत, असे सांगून त्यांनी वाढत्या प्रदूषणाचे परिणाम विषद केले. विद्यार्थ्यांनी उपस्थित केलेल्या विविध प्रश्नांची उत्तरे देऊन त्यांनी शंका समाधानही केले.

डॉ. जवाहर काबरा यांनी ग्रीन आर्मीची भूमिका विषद करून युवा पिढी पर्यावरण संरक्षण आणि संवर्धनाची जबाबदारी उत्तमरित्या पार पाडत असल्याचे आणि ग्रीन आर्मीबद्दल त्यांनी प्रशंसोद्गार काढले. प्राचार्य डॉ. बी. आर. गायकवाड यांनी मार्गदर्शनपर भाषणात पर्यावरण प्रश्नांचा ऊहापोह केला.

प्रास्ताविकपर भाषणात ग्रीन आर्मीच्या डॉ. प्रतिभा श्रीपत यांनी या पर्यावरण कार्यशाळेचा उद्देश विषद केला. त्या म्हणाल्या की, आजच्या ज्वलंत पर्यावरणाच्या गंभीर प्रश्नांची जाणीव व्हावी, यासाठी सृष्टी फाउंडेशनने पर्यावरणासाठी ग्रीन आर्मी या युवकांच्या चळवळीची निर्मिती केली. यामध्ये जेईएस महाविद्यालय, अंकुशराव टोपे महाविद्यालय, बद्रीनारायण बारवाले महाविद्यालयातील युवक सहभागी आहेत. अनेक नावीन्यपूर्ण पर्यावरणपूरक उपक्रम ग्रीन आर्मीच्या माध्यमातून राबवले जात असल्याचे श्रीपत यांनी स्पष्ट केले.

यावेळी यूथ ग्रीन आर्मीच्या समन्वयक डॉ. सुजाता देवरे, डॉ. स्वाती सुरेश पुरी, प्रा. पोपळघट, दिगंबर दाते, भुसे, संध्या जहागीरदार, प्रा. तारा काबरा, जयश्री कुंजके, संजीवनी देशपांडे, संगीता मुळे, राजश्री मुर्गे यावेळी ग्रीन आर्मीच्या विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Web Title: Waste Management Needs Time - Dr. Taware

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.