शेतकऱ्यांच्या स्वप्नांवरही पाणी; जालना जिल्ह्यातील ६७०० हेक्टरवरील शेतीला अवकाळीचा तडाखा
By विजय मुंडे | Published: November 28, 2023 07:03 PM2023-11-28T19:03:11+5:302023-11-28T19:03:57+5:30
पावसाची दुसऱ्या दिवशीही हजेरी : नुकसानीच्या पंचनाम्यासाठी अधिकारी, कर्मचारी बांधावर
जालना : जिल्ह्याच्या विविध भागात सोमवारी रात्री सलग दुसऱ्या दिवशीही वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. दोन दिवस झालेल्या अवकाळीमुळे अंदाजे ६७०० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असून, त्यामुळे संबंधित शेतकऱ्यांच्या स्वप्नांवरही पाणी पडले आहे. झालेल्या नुकसानीचे प्रशासकीय पातळीवरून पंचनामे सुरू करण्यात आले आहेत.
पावसाअभावी यंदाचा खरीप हंगाम पूर्णत: वाया गेला आहे. पावसाअभावी रब्बी हंगामावरही परिणाम झाला असून, उपलब्ध पाण्यावर पिके जगविण्याची धडपड शेतकरी करीत आहेत. मोठा खर्च करून रब्बीतील पिकांची जोपासणा करण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरू होती. परंतु, रविवारी रात्री जिल्ह्यात सर्वदूर अवकाळी पावसाने हजेरी लावली. वादळी वारे आणि गारपीट झाल्यामुळे जिल्ह्यातील बहुतांश भागातील पिकांचे अतोनात नुकसान झाले. फळपिकांनाही याचा फटका बसला. तर गारपीट झाल्यामुळे लहान- मोठी अशी तब्बल ५७ जनावरेही मयत झाली होती. तर चार घरांची पडझड या पावसात झाली होती. तर दुसऱ्या दिवशी साेमवारी रात्रीही जिल्ह्यात सर्वदूर अवकाळी पाऊस झाला. सलग दोन दिवस झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील जवळपास ६७०० हेक्टरवरील पिकांना फटका बसल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला आहे. त्यानुसार प्रशासकीय पथकांकडून नुकसानीचे पंचनामे सुरू करण्यात आले आहेत.
दोन हजार शेतकऱ्यांच्या तक्रारी
जिल्ह्यातील दोन हजार शेतकऱ्यांनी अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीबाबतच्या तक्रारी पिकविमा कंपनीकडे केल्या आहेत. नुकसानीनंतर ७२ तासात संबंधित शेतकऱ्यांनी पिकविमा कंपनीला माहिती देणे गरजेचे आहे. त्यासाठी १८००२००५१४२ या क्रमांकावर किंवा contactus@universalsompo.com या ई-मेलवर माहिती देणे गरजेचे आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी केली पाहणी
अवकाळी पावसामुळे फळपिकांसह रब्बी हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. कडवंची शिवारात झालेल्या नुकसानीची जिल्हाधिकारी डॉ. कृष्णनाथ पांचाळ यांनी मंगळवारी सकाळी पाहणी केली. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी गहिनीनाथ कापसे यांच्यासह कृषी, महसूल विभागाचे अधिकारी, कर्मचारी, शेतकऱ्यांची उपस्थिती होती.
मागील २४ तासात झालेला पाऊस
तालुका- मिमी
भोकरदन- १६.९ मिमी
जाफराबाद- १५.२ मिमी
जालना- १८.३ मिमी
अंबड- १४.१ मिमी
परतूर- ६.० मिमी
बदनापूर- १०.६
घनसावंगी- ५.८
मंठा- ७.२