भोकरदन तालुक्यात पाणी टंचाईचा बळी; विहीरीत तोल जाऊन पडल्याने मुलीचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2019 05:34 PM2019-04-06T17:34:03+5:302019-04-06T17:41:27+5:30
तालुक्यात निर्माण झालेल्या भीषण पाणी टंचाईचा पहिला बळी
भोकरदन (जालना ) : भोकरदन तालुक्यातील गोकुळ येथे विहीरीतुन पाणी शेंदताना तोल जाऊन दिपाली विष्णू शिंदे (१७) या मुलीचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी सकाळी ११ वाजेच्या दरम्यान घडली. तालुक्यात निर्माण झालेल्या भीषण पाणी टंचाईचा दिपाली पहिला बळी ठरली आहे.
शनिवारी सकाळी ११ वाजेच्या दरम्यान दिपाली व तिची लहान बहिण रूपाली (१३) या दोन्ही बहिणी त्यांची आई लंकाबाई शिंदे यांच्या सोबत गावालगत असलेल्या बाळू शेळके यांच्या विहीरीवर कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या. आई कपडे धुत असताना दिपाली विहीरीतुन पाणी शेंदुन देत होती. दरम्यान तिचा तोल जावून ती विहीरीत पडली. आई व बहिणीने आरडाओरड करताच ग्रामस्थांनी धाव घेतली. परंतु, डोक्याला जबर मार लागून ती मृत पावली होती.
पंधरा दिवसात तिघांचा मृत्यू
गोकूळ येथे पंधरा दिवसापूर्वी केळना नदीच्या पात्रात वाळू चा उपसा करीत असताना दोन तरूण मुलांचा वाळू खाली दबून मृत्यू झाला होता. यात आज पुन्हा दिपालीचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.