'गावात पाण्याची बोंब, टँकरसाठी प्रशासनाचा थांबा'; त्रस्त ग्रामस्थांचे शोले स्टाईल आंदोलन
By महेश गायकवाड | Published: May 30, 2023 02:35 PM2023-05-30T14:35:14+5:302023-05-30T14:35:43+5:30
महिनाभरापासून टँकरसाठी प्रशासनातील अधिकाऱ्यांकडे चकरा मारणाऱ्या शेवगळ गावातील ग्रामस्थांच्या पाण्याची समस्या अधिकाऱ्यांनी गांभीर्याने घेतली नाही.
जालना : घनसावंगी तालुक्यातील शेवगळ गावात महिनाभरापासून तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे. ग्रामपंचायतीने पंधरा दिवसांपूर्वी टँकर सुरू करण्याची मागणी पंचायत समिती तसेच तहसीलदारांकडे केली; परंतु एकही अधिकारी गावाकडे फिरकला नाही. त्यामुळे संतप्त महिला व पुरुषांनी आज सकाळी गावातील पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन केले. या आंदोलनानंतर पंचायत समितीचे अधिकारी गावात हजर झाले.
एक हजार ते बाराशे लोकसंख्या असलेल्या शेवगळ गावाला सात किलोमीटर अंतरावरील येवला येथील साठवण तलावाशेजारील विहिरीतून पाणीपुरवठा होतो; परंतु हा तलाव आटल्याने पाणीपुरवठा बंद झाला. गावातील तीनही हातपंपही नादुरुस्त आहेत. त्यामुळे गावात पाण्याची दुसरी व्यवस्था नसल्याने महिला व पुरुषांना दररोज सकाळी पाण्याची भटकंती करावी लागत आहे. ग्रामस्थांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हाधिकारी व गटविकास अधिकारी यांना भेटून गावची हकीकत सांगितली; परंतु त्यानंतरही गावाला टँकर सुरू झाला नाही. त्यामुळे संतप्त महिला व ग्रामस्थांनी गावातील पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन केले.
आंदोलनानंतर विस्तार अधिकारी गावात
महिनाभरापासून टँकरसाठी प्रशासनातील अधिकाऱ्यांकडे चकरा मारणाऱ्या शेवगळ गावातील ग्रामस्थांच्या पाण्याची समस्या अधिकाऱ्यांनी गांभीर्याने घेतली नाही. शेवटी पाण्यासाठी गावकऱ्यांना आंदोलन करावे लागले. त्यानंतर विस्तार अधिकारी खिल्लारे मंगळवारी गावात आले. त्यांनी गावातील जलस्रोतांची पाहणी केली.
सर्व जलस्त्रोत आटले
गावाची सार्वजनिक विहीर सात किमी अंतरावर आहे. तलाव आटल्यामुळे ती विहीरही कोरडी पडली आहे. गाव परिसरात पाण्याचे जलस्रोत नाही. शेतातील विहिरीवर जाऊन बैलगाडीतून पाणी आणावे लागते. गावातील सगळे हातपंप बंद आहेत. असे असताना प्रशासनाला आमच्या गावाचे काहीही देणे-घेणे राहिलेले नाही.
- अनुसय रंनपिसे, ग्रामस्थ
ग्रामस्थांचे हाल सुरु आहेत
महिनाभरापासून पाण्यासाठी आमचे हाल सुरू आहेत. सरपंच, ग्रामसेवक लक्ष देत नाही. ग्रामपंचायतीने टँकर मागणीचा प्रस्ताव सादर केला. एकही अधिकारी गावातून येऊन पाहणी करून गेले नाही. त्यामुळे हे आंदोलन करावे लागले.
- सुनीता गोरे, ग्रामस्थ