जालना जिल्ह्यातील २६ गावांमध्ये पाणीटंचाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2018 12:42 AM2018-11-15T00:42:21+5:302018-11-15T00:43:03+5:30
भर हिवाळ्यामध्ये जिल्ह्यातील २६ गावे व २ वाड्यांमध्ये पाण्याची समस्या तयार झाली असून सध्या येथे ४५ पाण्याचे टँकर शासनाकडून सुरू करण्यात आले
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : भर हिवाळ्यामध्ये जिल्ह्यातील २६ गावे व २ वाड्यांमध्ये पाण्याची समस्या तयार झाली असून सध्या येथे ४५ पाण्याचे टँकर शासनाकडून सुरू करण्यात आले आहेत. तर ६७ विहिरी पाण्यासाठी अधिग्रहण करण्यात आल्या आहेत.
यंदा जालना जिल्ह्यात पावसाने दडी मारली आहे. यामुळे जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे विहिरींनी तळ गाठला आहे. छोटी-मोठी प्रकल्प आटली आहेत. परिणामी जनावरांच्या चारा, पाण्यासोबत नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याची समस्या बनली आहे. हिवाळ््यामध्येच पाण्याची समस्या बनली असल्याने येणाऱ्या काळात ही समस्या किती उग्र रूप धारण करेल यांची भीती ग्रामस्थांमध्ये आहे.
सध्या स्थितीत २६ गावे व २ वाड्यांमध्ये शासकीय १६ व खासगी २९ असे अकूण ४५ पाण्याचे टँकर सुरू करण्यात आले आहेत. तर ६७ विहिरी पाण्यासाठी अधिग्रहण करण्यात आल्या आहेत. ४५ टँकरच्या एकूण ९३ फे-या मंजूर झालेल्या आहेत. शासनाकडे टँकर सुरू करण्याचे प्रस्ताव येताच त्याला मंजूरी देऊन तत्काळ पाणी टंचाई असलेल्या गावांमध्ये टँकर सुरू करण्यात येत असल्याची माहिती संबंधितांनी दिली आहे.