पाण्यामुळे रक्त सांडले! विहिरीच्या पाणी वाटपावरून चुलत्याकडून पुतण्याचा खून
By दिपक ढोले | Published: October 17, 2023 12:31 PM2023-10-17T12:31:47+5:302023-10-17T12:32:00+5:30
पोलिसांनी या प्रकरणात पाच जणांना ताब्यात घेण्यात आले असून, दोघे जण फरार आहेत
जालना : विहिरीच्या पाणी वाटपावरून चुलत्यासह सात जणांनी पुतण्याला काठी, लोखंडी रॉडने मारून खून केल्याची घटना जालना तालुक्यातील मौजपुरी येथे सोमवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास घडली. योगेश बाबासाहेब डोंगरे (२५) असे मयताचे नाव आहे. या प्रकरणात पाच जणांना ताब्यात घेण्यात आले असून, दोघे जण फरार असल्याचे सांगण्यात आले.
योगेश डोंगरे यांचे चुलते शालिकराम उर्फ सावळाराम आसाराम डोंगरे यांच्यासोबत शेतातील विहिरीच्या पाण्यावरून सोमवारी रात्री वाद झाले होते. संशयित शालिकराम ऊर्फ सावळाराम आसाराम डोंगरे, पंडित आसाराम डोंगरे, पवन भगवान टोपे, नानीबाई आसाराम डोंगरे, कविता शालिकराम ऊर्फ सावळाराम डोंगरे, आसाराम शंकर डोंगरे आणि एक विधिसंघर्ष बालक (सर्व रा. मौजपुरी) यांनी सोमवारी रात्री ११ वाजता योगेश डोंगरे, त्यांची पत्नी शिल्पा आणि मुलगा गणेश यांना काठ्या, लोखंडी रॉड व लाकडी ढिल्पीने मारहाण केली. त्यात योगेश डोंगरे यांचा मृत्यू झाला. तर अन्य दोघेजण गंभीर जखमी झाले.
घटनेची माहिती मौजपुरी पोलिसांना देण्यात आली.पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना तातडीने रूग्णालयात दाखल केले. तर योगेश डोंगरे यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा सामान्य रूग्णालयात पाठविण्यात आला. रात्रीच पोलिसांनी पाच आरोपींना ताब्यात घेतले आहे. दोघे जण फरार असल्याचे सांगण्यात आले. घटनास्थळाला उपविभागीय पोलिस अधिकारी सुरेश बुधवंत, सपोनि. मिथुन घुगे, पोउपनि. नेटके यांनी भेट दिली. या प्रकरणी बाबासाहेब चांगोजी डोंगरे यांच्या फिर्यादीवरून सात जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.