भोकरदनसह २५ गावांवर पाणीटंचाईचे सावट...!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2018 12:03 AM2018-09-10T00:03:38+5:302018-09-10T00:03:53+5:30
भोकरदन शहरासह २५ गावांना पाणीपुरवठा करणारे दानापूर येथील जुई धरणात केवळ आठ दिवस पुरेल एवढाच पाणी साठा शिल्लक असल्याने उपविभागीय अधिकारी हरिश्चंद्र गवळी, तहसीलदार संतोष गोरड यांनी बुधवारी धरणाची पाहणी केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
भोकरदन : भोकरदन शहरासह २५ गावांना पाणीपुरवठा करणारे दानापूर येथील जुई धरणात केवळ आठ दिवस पुरेल एवढाच पाणी साठा शिल्लक असल्याने उपविभागीय अधिकारी
हरिश्चंद्र गवळी, तहसीलदार संतोष गोरड यांनी बुधवारी धरणाची पाहणी केली.
जुई धरणात आता केवळ आठ दिवस पुरेल एवढाच पाणीसाठा शिल्लक राहिला असल्याने भोकरदन शहराला पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार असल्याचे चित्र आहे. नुकत्याच झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीनंतर माजी नगराध्यक्ष राजाभाऊ देशमुख, गटनेते संतोष अन्नदाते यांनी जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांना भेटून संभाव्य पाणीटंचाईचे निवारण करण्यासाठी तात्काळ टँकर मंजूर करण्यासाठी निवेदन दिले. त्यानंतर जिल्हाधिकारी बिनवडे यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांना धरणाची प्रत्यक्ष पाहणी करण्याच्या सूचना दिल्या.
त्या अनुषंगाने उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, उपअभियंता, मंडळ अधिकारी, तलाठी बुधवारी धरणाची पाहणी करून या धरणात दहा दिवस पाणीपुरवठा होईल एवढाच पाणीसाठा शिल्लक असल्याचा अहवाल जिल्हाधिका-यांना पाठविला असल्याचे सांगण्यात आले.