जालना जिल्ह्यात ८२ गावांना ११६ टँकरने पाणीपुरवठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2018 12:47 AM2018-12-31T00:47:56+5:302018-12-31T00:48:36+5:30
जिल्ह्यात सध्या ८२ गावांमध्ये ११६ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : यंदा जिल्ह्याकडे पावसाने पाठ फिरवल्यामुळे दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे हिवाळ््यातच जिल्ह्यात तीव्र पाणी टंचाई भासत असून, जिल्ह्यात सध्या ८२ गावांमध्ये ११६ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. तर भोकरदन शहर व तालुक्यात ५९ तर, जाफराबादमध्ये ३३ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे.
जिल्ह्यात यंदा दुष्काळ दाह मोठ्या प्रमाणात जाणवू लागला आहे. या दुष्काळी परिस्थितीत तहानलेल्या जनतेला पाणीपुरवठा करण्याचे आव्हान प्रशासनापुढे असणार आहे. ऐन हिवाळ्यात जिल्ह्यात ११६ टँकर सुरू आहेत. टंचाईस्थिती तीव्र होणार असून दोन महिन्यानंतर जिल्ह्यात हजारो टँकरच्या खेपा करून पाणी पुरवठा करावा लागणार आहे.
जालना जिल्हा हा दुष्काळी जिल्हा म्हणून ओळखला जातो. जिल्ह्यात या वर्षी अत्यल्पच पाऊस झाला आहे. त्यामुळे खरिपाची पिके आली नाहीत व रबीची पेरणी झाली नाही. जिल्ह्यातील सर्वच गावांची पैसेवारी पन्नास पैशांपेक्षा कमी आली आहे. पावसाळ्याचे चार महिने कोरडे गेले असल्याने जिल्हा प्रशासनासमोरील चिंता वाढली आहे. येत्या काळात पाणीटंचाई मोठ्या प्रमाणात जाणवणार असल्याने पिण्याच्या पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण होणार आहे. ऐन हिवाळ्यात जिल्ह्यात ११६ टँकर सुरू आहेत. तर जिल्ह्यातील भोकरदन तालुक्याला भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. भोकरदन शहरात २०, तर तालुक्यात ३९ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. जाफराबाद तालुक्यात ३३ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येणार आहेत.
पाणीपुरवठा करण्याचे आव्हान
काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुष्काळी परिस्थितीबाबत प्रशासनाची आढावा बैठक घेतली. तेव्हा त्यांनी टंचाईस्थितीचा आढावा घेतला होता. जिल्ह्यात आगामी काळात जास्त अंतरावरून पाणीपुरवठा करावा लागेल, असे सांगून त्यांनी प्रशासनास कामाला लावले. जिल्ह्यात जरी सध्या ११६ टँकर सुरू असले, तरी फेब्रुवारी, मार्चमध्ये हा आकडा वाढण्याची शक्यता आहे. प्रशासनाच्या अंदाजानुसार मार्चनंतर जिल्ह्यातील ९०८ गावांत पाणी पुरवण्याचे आव्हान प्रशासनासमोर असणार आहे.