चार दिवसाआड होणार शहरवासीयांना पाणीपुरवठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2019 12:44 AM2019-11-02T00:44:49+5:302019-11-02T00:45:32+5:30
लवकरच शहराला चार दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचे नियोजन पालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : नवीन जालना भागाला पाणीपुरवठा करणारा घाणेवाडी प्रकल्प ओव्हरफ्लो झाला आहे. मात्र, समृद्धी महामार्गाच्या कामात फुटलेली पाईपलाईन पाणीपुरवठा सुरळीत करण्यात अडथळा निर्माण झाली होती. या फुटलेल्या पाईपलाईन दुरुस्तीचे काम पालिकेच्या वतीने हाती घेण्यात आले आहे. हे काम अंतीम टप्प्यात असून, लवकरच शहराला चार दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचे नियोजन पालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.
गतवर्षीप्रमाणे यंदाही पावसाळ्याच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत सरासरीच्या अपेक्षित पाऊस झालेला नव्हता. जुना जालना शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जायकवाडी प्रकल्पात अपुरा पाणीपुरवठा होता. तर नवीन जालना भागाला पाणीपुरवठा करणारा घाणेवाडी प्रकल्प कोरडाठाक पडला होता. त्यामुळे शहरातील पाणीवितरण व्यवस्थेवर परिणाम झाला होता. जायकवाडी प्रकल्पातून मिळणाºया पाण्यावर पालिकेने पाणीवितरणाचे नियोजन केले होते. मात्र, अनेक भागात दहा ते बारा दिवसानंतर पाणीपुरवठा होत होता. मात्र, परतीच्या पावसाने दमदार हजेरी लावली आणि जायकवाडी प्रकल्पासह घाणेवाडी प्रकल्प ओव्हरफ्लो झाला. त्यामुळे आता जुना जालना व नवीन जालना भागातील पाणीपुरवठ्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे.
नवीन जालना भागाला घाणेवाडी प्रकल्पातून पाण्याचा पुरवठा केला जातो. मात्र, समृध्दी महामार्गाच्या कामात या पाणीपुरवठा योजनेवरील पाईप फुटले होते. घाणेवाडी प्रकल्प भरल्याने नवीन जालना भागाचा पाणीप्रश्न मार्गी लागला आहे. त्यामुळे फुटलेल्या पाईपलाईनच्या दुरूस्तीचे कामही पालिकेकडून हाती घेण्यात आले आहे. हे काम चार ते पाच दिवसात पूर्ण होण्याची आशा पालिकेकडून वर्तविण्यात आली आहे. त्यानंतर जुना जालनासह नवीन जालना भागात चार दिवसाला पाणीपुरवठा करण्यात येणार असल्याची माहिती पालिकेतील सूत्रांनी दिली.