घनसावंगी तालुक्यात नऊ गावांत टँकरने पाणीपुरवठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2019 01:01 AM2019-01-17T01:01:20+5:302019-01-17T01:01:36+5:30
तालुक्यातील ९ गावांत टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू असून, चार गावांनी टँकरसाठी प्रस्ताव पाठविलेला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
घनसावंगी : तालुक्यात यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्यामुळे खरीप पीक पूर्णपणे गेले. नदी-नाले कोरडेठाक पडले. तालुक्यातील जोगलादेवी, मंगरूळ, राजाटाकळी केटीवेअर भरले नाही. म. चिंचोली, मांदळा, येवला, सिद्धेश्वर पिंपळगाव, देवी दहेगाव तेलगू तलाव कोरडेठाक पडलेले आहेत. त्यामुळे तालुक्यातील गावागावातील विहिरींनी तळ गाठला आहे.
सद्य परिस्थतीत तालुक्यातील ९ गावांत टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू असून, चार गावांनी टँकरसाठी प्रस्ताव पाठविलेला आहे. घनसावंगी तालुक्यात ७० हजार पशुधनाच्या चारा-पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. कडब्याचे भाव गगनाला भिडले आहेत. गुरांसाठी शेतकरी ऊस विकू लागले आहेत. साखर कारखाने सुरू होण्याअगोदरच पाणी आटल्यामुळे ऊस करपले, वाढे वाढले आहेत तर तालुक्यातील गावामध्ये सव्वादोन लाख हजार लोकसंख्येसाठी पूर्णपणे पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. अजून सहा महिने जायचे आहेत पाण्याचा प्रश्न अत्यंत बिकट होत चालला आहे. यामुळे लहान मुले व वृद्धांचे हाल होत आहेत.
प्रशासन स्तरावर यासाठी उपाययोजना होणे गरजेचे आहे. गतवर्षी पावसाचे प्रमाण चांगले राहिल्याने जलसाठ्यात वाढ झाली होती.
९ गावांना लागते दररोज २५ टॅकर पाणी, तीन विहिरींचेही केले अधिग्रहण
सध्या तालुक्यात नऊ गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा चालू आहे. दररोज या ९ गावांना जवळपास २५ टँकर पाणी लागते. त्यामध्ये वडीरामसगाव, बाचेगाव, राहेरा, रांजणी प्रत्येकी १, रांजणी २, शिंदे वडगाव, बहीरगड, राजेगाव, राहेरा तांडा टँकर नऊ गावांमध्ये टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू आहे. हे टँकर भरण्यासाठी विहिरी अधिग्रहित केल्या आहेत. तर पिण्याच्या पाण्यासाठी ३ विहिरी अधिग्रहण केल्या आहेत. तालुक्यातील रामगव्हाण, भायगव्हाण, बोधलापुरी, बोलेगाव या चार गावांनी टँकरची मागणी केलेली आहे. यासाठीचे प्रस्ताव दाखल करण्यात आल आल्याची माहिती नायब तहसीलदार संदीप मोरे व गट विकास अधिकारी पांडव यांनी दिली.