स्वखर्चाने मंदिर, मशिद, नागरिकांना टँकरने पाणीपुरवठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2019 12:29 AM2019-07-14T00:29:54+5:302019-07-14T00:30:11+5:30
पाणी प्यायल्यानंतर जेव्हा हरण, काळवीटसह अन्य प्राणी उड्या मारत पळतात तो क्षण माझ्या मनाला मोठा आनंद देतो असे, वन्य प्राण्यांचा जीवनदाता म्हणून ओळख निर्माण झालेले अली बीन सईद चाऊस यांनी सांगितले.
गजानन वानखडे।
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : मनुष्याला तहान लागली तर तो कोणाला आवाज देऊन पाणी मागू शकतो, परंतु मुक्या जनावरांना तहान लागल्यास ते कोणाला पाणी मागणार, हाच विचार मला स्वस्थ बसू देत नव्हता. यामुळे २००२ पासून वन्य प्राण्यांची पाण्याविना होणारी गैरसोय थांबविण्यासाठी मी औद्योगिक परिसरात वन्य प्राण्यांना पाणी पिता येईल, असा खड्डा तयार केला आणि त्यात टँकरचे पाणी टाकून वन्य प्राण्यांसाठी पाण्याची सोय केली. पाणी प्यायल्यानंतर जेव्हा हरण, काळवीटसह अन्य प्राणी उड्या मारत पळतात तो क्षण माझ्या मनाला मोठा आनंद देतो असे, वन्य प्राण्यांचा जीवनदाता म्हणून ओळख निर्माण झालेले अली बीन सईद चाऊस यांनी सांगितले.
जूना जालना परिसरात राहणारे ५३ वर्षीय अली चाऊस यांची परिस्थिती बेताचीच आहे. औद्योगिक वसाहतीतील वेगवेगळ्या कंपन्यांना ते टँकरने पाणीपुरवठा करतात. यातून सहा ते सात हजार रुपये मिळतात.
यातील दोन ते अडीच हजार रुपयांचे पाणी खरेदी करुन ते वन्य प्राण्यांची तहान भागवितात. यासाठी त्यांनी औद्योगिक परिसरात असलेल्या वनपरिक्षेत्रात वन्य प्राण्यांना पाणी पिता येईल असा खड्डा खोदून त्यात प्लास्टिकची पन्नी टाकून वन्य प्राण्यांसाठी पाण्याची सोय केली आहे.
गेल्या २१ वर्षापासून हे काम अविरत करत असल्याने यातून एक वेगळाच आनंद मिळतो, असे अली चाऊस म्हणाले.
बेसुमार वृक्षतोडीमुळे पर्यावरणाचा समतोल बिघडला. त्यामुळेच पावसाचे प्रमाण कमी झाल्याने नागरिकांसह वन्य प्राण्यांना याचा त्रास सहन करावा लागत असल्याची खंत चाऊस यांनी व्यक्त केली. पर्यावरणाचा -हास थांबविण्यासाठी सर्वानीच प्रयत्न करण्याचे गरज असल्याचे ते चाऊस म्हणाले. यात माझ्या कुटुंबियांनी सुध्दा मला या कामासाठी नेहमीच सहकार्य करत असल्याने मला हे काम करण्यास बळ मिळते.
नागरिकांसाठी पाण्याची मोफत सोय
अली चाऊस हे शहरातील नागरिकांना मोफत टँकरचे मोफत पाणी वाटप करतात. यामध्ये शनिमंदिर, इंदिरानगर, चंदनझिरा, इतवारा गल्ली, गणपती गल्ली आदी परिसरातील नागरिकांची तहान भागवितात. याबाबत अली चाऊस यांना विचारले असता. औद्योगिक परिसरात टँकरने पाणी विकून कमाविलेल्या पैशातून अडीच हजार रुपयांचे पाणी मंठा चौफुली परिसरातून विकत घेऊन शहरातील गरजवंत, मंदिर, मशिद तसेच लग्नसमारंभाला मोफत देतो. पाणी मिळाल्याचा नागरिकांच्या चेहऱ्यावरील आनंद बघून मला सुध्दा आनंद होत असल्याचे अली चाऊस यांनी सांगितले. जोपर्यंत माझे हातपाय चालेल तोपर्यत हे कार्य अविरत चालू ठेवणार आहे. मोफत पाणी वाटप करुन अली यांनी एक आदर्श निर्माण केला.