२४ दिवसाच्या खंडानंतर जुना जालना भागात बुधवारी होणार पाणीपुरवठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2020 01:07 AM2020-02-04T01:07:09+5:302020-02-04T01:07:25+5:30
तब्बल २४ दिवसाच्या खंडानंतर बुधवारी जुना जालना भागाला पाणीपुरवठा केला जाणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : निखळलेल्या पाईपलाईन दुरूस्तीचे काम पूर्ण झाले असून, सोमवारी जायकवाडीतील एका मोटारीद्वारे पाण्याचा उपसा सुरू करण्यात आला आहे. हे पाणी अंबड येथील जलशुध्दीकरण केंद्रात आले असून, तब्बल २४ दिवसाच्या खंडानंतर बुधवारी जुना जालना भागाला पाणीपुरवठा केला जाणार आहे.
जायकवाडी प्रकल्पातून जुना जालना भागाला पाणीपुरवठा केला जातो. पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाईनच्या पाईप पैकी प्रारंभी रस्ता दुरूस्तीच्या कामात निखळला. नंतर पाण्याचा दाब वाढल्याने हा पाईप सतत निखळत होता. त्यामुळे नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल, मुख्याधिकारी नार्वेकर यांनी तातडीने कामे हाती घेऊन पाईपलाईनची दुरूस्ती केली. निखळणाºया पाईपावर सिमेंंटचे अस्तरीकरण करण्यात आले आहे. त्यानंतर सोमवारी जायकवाडीतील एका मोटारीद्वारे पाण्याचा उपसा सुरू करून पाईप निखळतो का, याची चाचपणी घेण्यात आली. पाणी अंबड येथील जलशुध्दीकरण केंद्रात आले असून, मंगळवारी सायंकाळी जुना जालना भागातील काही भागाला पाणीपुरवठा होणार आहे.
बुधवारी संपूर्ण भागाला पाणीपुरवठा केला जाणार असल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले.