पाणीचोर बिनधास्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2017 12:02 AM2017-12-11T00:02:01+5:302017-12-11T00:02:05+5:30
शहरातील २० हजारांपेक्षा अधिक असलेल्या अवैध नळ जोडण्यांचा शोध घेण्यासाठी पालिकेने स्थापन केलेले पथकही कागदावरच आहे.
जालना : जायकवाडी-जालना योजनेतून शहराला मुबलक पाणी उपलब्ध होत असतानाही केवळ वितरण व्यवस्थेतील अडचणींमुळे शहराला आठवड्यातून एकदा पाणीपुरवठा होत आहे. शहरातील २० हजारांपेक्षा अधिक असलेल्या अवैध नळ जोडण्यांचा शोध घेण्यासाठी पालिकेने स्थापन केलेले पथकही कागदावरच आहे.
नगर पालिकेच्या नोंदीनुसार शहरात ४४ हजार मालमत्ता असून, सध्या सुरू असलेल्या सर्वेक्षणानुसार त्यात सुमारे २० हजार मालमत्तांची भर पडण्याची शक्यता आहे. असे असले तरी पालिकेच्या पाणीपुरवठा विभागात केवळ २२ हजार अधिकृत नळ जोडण्यांची नोंद आहे. अधिकृत जोडणी असणारे अनेक नागरिक नियमित पाणीपट्टी भरीत नाहीत. पाणीपट्टीची वसुली जेमतेमच आहे. त्यामुळे शहरात अवैध नळ जोडण्यांच्या माध्यमातून होणारी पाणी चोरी थांबविणे गरजेचे आहे. विविध भागात असलेल्या अवैध नळ जोडण्यांचा शोध घेऊन संबंधितांवर दंडात्मक कारवाई करणे, तसेच थेट गुन्हे दाखल करण्यासाठी पालिकेने नवीन जालना व जुना जालना भागासाठी २६ कर्मचा-यांचे पथक तयार केले आहे. या मोहिमेसाठी पथक प्रमुख म्हणून सुरेश गंगासागरे यांची तर कारवाईस सहायक म्हणून पाणीपुरवठा अभियंता अशोक दासवाड व संजय वाघमारे यांची नेमणूक करण्यात आली आहे. शहरातील विविध भागांतील नळ जोडण्यांचा आठ ते पाच या वेळेत शोध घेण्याच्या सूचना पथकातील कर्मचा-यांना देण्यात आल्या आहेत. मात्र, अवैध नळजोडणी शोध पथकाने अद्यापही प्रत्यक्षात कामाला सुरुवात केलेली नाही. त्यामुळे पालिकेची पाणीपट्टीही बुडत असून, मुख्य जलवाहिनीवर अवैध जोडण्या घेऊन पाणीचोरीचे प्रकार सुरूच आहेत. पाणीपट्टीची वसुली अत्यंत कमी असल्यामुळे पालिकेला पाणीपुरवठा योजनेचा वाढता खर्च भागविताना मोठी कसरत करावी लागत आहे.
-----------
नवीन जालना व जुना जालना भागातील अवैध नळ जोडण्यांचा शोध घेण्यासाठी दोन स्वतंत्र पथके तयार करण्यात आली आहेत. पथकात २६ कर्मचा-यांचा समावेश आहे. मुख्याधिका-यांचे कारवाईचे आदेश मिळताच अवैध नळ शोध मोहिमेला कारवाईला सुरुवात केली जाईल.
सुरेश गंगासागरे, अवैध नळ शोध मोहीम प्रमुख.