वाटूर रस्त्याची पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2021 04:14 AM2021-01-24T04:14:18+5:302021-01-24T04:14:18+5:30
मागण्यांचे निवेदन मंठा : मंठा व परतूर तालुक्यात संजय गांधी निराधार योजनेपासून वंचित असलेल्या लाभार्थ्यांना तातडीने पेन्शन सुरू करावी, ...
मागण्यांचे निवेदन
मंठा : मंठा व परतूर तालुक्यात संजय गांधी निराधार योजनेपासून वंचित असलेल्या लाभार्थ्यांना तातडीने पेन्शन सुरू करावी, अशा मागणीचे निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना राज्य कार्यकारिणी सदस्य सिद्धेश्वर काकडे यांनी परतूर उपविभागीय अधिकारी भाऊसाहेब जाधव यांना दिले आहे. वेळीच निवेदनातील मागण्यांची दखल घ्यावी, असेही म्हटले आहे.
शिक्षकांची सभा
जाफराबाद : विनाअनुदानित शिक्षकांच्या वेतन अनुदानासह विविध मागण्यांसाठी विविध संघटनांच्या वतीने २९ जानेवारी रोजी मुंबई येथे आंदोलन करण्यात येणार आहे. याच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी शहरातील समर्थ महाविद्यालयात शिक्षकांची सहविचार सभा घेण्यात आली. या कार्यक्रमास निवृत्ती दिवटे, संजय अंभोरे, गजानन बुरकुल, सदानंद लोखंडे आदींची उपस्थिती होती.
विजयी उमेदवारांचा गौरव
मंठा : तालुक्यातील पाटोदा ग्रामपंचायत निवडणूक राष्ट्रवादी आणि भाजप यांच्यात अटीतटीची झाली, परंतु या लढतीत भाजपचे जिल्हा परिषद सदस्य पंकज बोराडे यांच्या पॅनेलला १३ पैकी सात जागांवर विजय मिळविता आला आहे. याबद्दल आमदार बबनराव लोणीकर व तालुका अध्यक्ष सतीश निर्वळ यांच्या वतीने पॅनलप्रमुख पंकज बोराडे यांच्यासह विजयी उमेदवारांचा गौरव करण्यात आला.
किनगावात विजयी उमेदवारांचा गौरव
जामखेड : किनगाव येथील ग्रामपंचायतच्या निवडणुकीत विजयी झालेल्या उमेदवारांचा भारतीय काँग्रेस कमिटीचे सदस्य भीमराव डोंगरे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी डॉ.राहुल डोंगरे, गणेश चव्हाण, अमोल चव्हाण यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती. यावेळी गौरव करण्यात आलेल्या विजयी उमेदवारांनी मनोगत व्यक्त केले.
पाणेवाडी-आंतरवाली रस्त्याची दुरवस्था कायम
घनसावंगी : तालुक्यातील पाणेवाडी ते आंतरवाली दाई या तीन किलोमिटर रस्त्याची मोठी दुरवस्था झाली आहे. विशेष म्हणजे मागील दोन वर्षांपूर्वी या रस्त्याचे उद्घाटन झाले होते, परंतु अद्याप रस्त्याच्या कामाला प्रारंभ झालेला नाही. त्यामुळे ग्रामस्थांमधून संताप व्यक्त केला जात असून, वेळीच रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे.