धान्य वाटपाचा प्रश्न लागला मार्गी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2020 12:21 AM2020-03-29T00:21:56+5:302020-03-29T00:23:04+5:30

जालना तालुक्यातील शेतकरी धान्य योजनेचा प्रश्न मार्गी लागला असून, याचा ३५ हजार ४११ शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे

By the way the grain allocation was questioned | धान्य वाटपाचा प्रश्न लागला मार्गी

धान्य वाटपाचा प्रश्न लागला मार्गी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : शेतकरी धान्य योजनेंतर्गत एप्रिल महिन्याचे नियतन प्राप्त झाले नव्हते. या पार्श्वभूमीवर जालन्याचे आमदार कैलास गोरंट्याल यांनी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्याशी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधून चर्चा केली. या चर्चेनंतर जालना तालुक्यातील शेतकरी धान्य योजनेचा प्रश्न मार्गी लागला असून, याचा ३५ हजार ४११ शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे. प्रत्येकी तीन किलो गहू, दोन किलो तांदूळ लाभार्थी शेतकऱ्यांना मिळणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने केलेल्या घोषणेनुसार येत्या तीन महिन्यांचे अतिरिक्त धान्य देखील लवकरच उपलब्ध होणार असल्याची माहिती आ. गोरंट्याल यांनी दिली.
राज्य शासनाने दुष्काळग्रस्त भागातील एपीएल अंतर्गत गरीब शेतकरी कुटुंबांना प्रति व्यक्ती तीन किलो गहू, दोन किलो तांदूळ वाटप करण्याचा धोरणात्मक निर्णय यापूर्वीच घेतलेला आहे. परंतु, सदर योजनेंतर्गत मार्च महिना संपत आलेला असतानाही राज्य शासनाकडून धान्य प्राप्त झाले नव्हते. सध्या कोरोना या संसर्गजन्य आजाराच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण व शहरी भागातील गोरगरीब कुटुंबाच्या अन्न धान्याचा प्रश्न निर्माण झाल्यामुळे जालन्याचे आ. कैलास गोरंट्याल यांनी थेट राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्याशी शुक्रवारी भ्रमणध्वनीवर संपर्क साधून शेतकरी कुटुंब योजनेंतर्गत धान्याच्या प्रश्नासंदर्भात चर्चा केली. त्यानंतर शेतकरी कुटुंब योजनेंतर्गत एप्रिल महिन्याचे देय असलेले धान्याचे नियतन तातडीने करण्याचे आदेश देण्याची ग्वाही भुजबळ यांनी दिली.
आ. गोरंट्याल यांच्या पाठपुराव्यामुळे जालना तालुक्यातील सुमारे ३५ हजार ४११ शेतकरी लाभार्थ्यांना धान्य वाटपाचा प्रश्न मार्गी लागला असून, कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर येत्या तीन महिन्यासाठी अतिरिक्त धान्य वाटप करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतलेला आहे. सदर धान्य देखील लवकरच संबंधित लाभार्थ्यांना वाटप करण्यात येईल, अशी ग्वाही आ. गोरंट्याल यांनी दिली आहे.
दरम्यान जिल्हा प्रशासनाच्या वतीने देखील आगामी तीन महिन्यांसाठीचे अन्नधान्य वाटपाचे नियोजन केले जात आहे. यामुळे नागरिकांनी अन्नधान्य मिळणार नाही, याची भीती न बाळगता अतिरिक्त साठा करू नये, असेही गोरंट्याल म्हणाले.
शिधापत्रिकेसाठी तहसील कार्यालयाशी संपर्क साधा
राज्य शासनाने राज्यातील गोरगरीब कुटुंबांना स्वस्त धान्य दुकानाच्या माध्यमातून माफक दरात गहू, तांदूळ व इतर जीवनावश्यक वस्तू वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, अनेक कुटुंबांकडे शिधापत्रिका उपलब्ध नसल्याने असे कुटुंब शासनाच्या या योजनेपासून वंचित राहत आहेत. अशा सर्व कुटुंब प्रमुखांनी जालना तहसील कार्यालयाशी संपर्क साधून शिधापत्रिका आॅनलाईन करुन घ्याव्यात, जेणे करुन सदर कुटुंबांना देखील स्वस्त धान्य दुकानातून धान्य मिळण्याचा मार्ग मोकळा होईल.
दरम्यान, आ. कैलास गोरंट्याल यांनी पुरवठा मंत्री भुजबळ यांच्यासमवेत अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंब योजनेंतर्गत दिल्या जाणा-या लाभासंदर्भात देखील चर्चा केली. प्राप्त नियतनानुसार ग्रामीण भागात लोकसंख्येच्या प्रमाणात ७६ टक्के तर शहरी भागात ४६ टक्के या रेषोप्रमाणे धान्य वाटपाचे शासनाचे आदेश आहेत.
शासनाने निश्चित केलेल्या शहरी भागातील या रेषेमध्ये बदल केल्यास शहरातील गरीब कुटुंबातील लोकांना शासनाच्या धान्य वाटप योजनेचा अधिक प्रमाणात लाभ होण्यास मदत होईल, याकडेही आ. गोरंट्याल यांनी भुजबळ यांचे लक्ष वेधले. या संदर्भात शासन स्तरावरुन सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, अशी ग्वाही भुजबळ यांनी दिल्याचे आ. गोरंट्याल यांनी सांगितले.

Web Title: By the way the grain allocation was questioned

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.