ड्रायपोर्टच्या माध्यमातून आम्ही मुंबईचा समुद्र जालन्यात आणला! नितीन गडकरी यांचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2024 01:49 PM2024-03-13T13:49:14+5:302024-03-13T13:52:56+5:30
जालना शहराजवळील ‘गती शक्ती कार्गो टर्मिनल’चे (ड्रायपोर्ट) मंगळवारी दूरदृश्य प्रणालीद्वारे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण झाले.
जालना : मुंबईतील जेएनपीटी बंदरावर मिळणाऱ्या सेवा जालन्यातील ड्रायपोर्टवर मिळणार असून, येथून उत्पादित मालाची निर्यात जगभरात होणार आहे. या ड्रायपोर्टच्या माध्यमातून जणू मुंबईचा समुद्रच आता जालन्यात आणला आहे, असे मत केंद्रीय रस्ते, परिवहन व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले.
जालना शहराजवळील ‘गती शक्ती कार्गो टर्मिनल’चे (ड्रायपोर्ट) मंगळवारी दूरदृश्य प्रणालीद्वारे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण झाले. यानिमित्ताने दिनेगाव येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, आ. नारायण कुचे, माजी मंत्री अर्जुन खोतकर, जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना, पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल, रेल्वेच्या डीआरएम नीती सरकार, जेएनपीटीचे चेअरमन उमेश काळे आदी उपस्थित होते.
कसा आहे ड्रायपोर्ट?
पहिल्या फेजमध्ये ड्रायपोर्टचे काम झाले आहे. दुसऱ्या टप्प्यात लॉजिस्टिक पोर्ट बांधले जाणार आहेत. भाजीपाला - फळे ठेवण्यासाठी आयक्युब शीतगृह निर्मितीसह इतर कामे होणार आहेत. केंद्र शासनाच्या फूड प्रोड प्रोसिसिंगमध्ये मोठी सबसिडी आहे. त्याचा लाभ घेऊन येथे शीतगृह निर्माण केली जावीत. त्यामुळे इथला भाजीपाला, मोसंबी, लिंबू, कापूस जगभरात निर्यात केला तर किंमत वाढून शेतकऱ्यांना अधिक भाव मिळेल. १५ वर्षांपूर्वीच्या बस, कार स्क्रॅप करण्याचा निर्णय घेतला आहे. जालन्यात रोलिंग मशीन अधिक आहेत. त्यांना याचा लाभ होऊन कच्चा माल मिळेल. ड्रायपोर्टमुळे रोजगार निर्मिती होऊन तरुणांच्या हाताला काम मिळेल, असेही गडकरी म्हणाले.
जालन्याला सर्वाधिक कनेक्टिव्हिटी : दानवे
रेल्वे विभागाला अधिक निधी उपलब्ध झाल्याने महाराष्ट्रात मार्गांची कामे करता आली. काही नवीन मार्गांना मंजुरी मिळाली आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना येथील रेल्वे स्थानकाचे काम सुरू आहे. एकेकाळी मागास जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जालना जिल्ह्याला आज मराठवाड्यात सर्वाधिक कनेक्टिव्हिटी आहे. रेल्वे, रस्त्यांचे चारही बाजूंनी जाळे झाले आहे. आता ड्रायपोर्टमुळे येथून जगभरात मालाची निर्यात करता येणार असल्याचे रेल्वे राज्यमंत्री दानवे म्हणाले.