आम्ही राजकीय भाषा बोलत नाही, तुम्ही आरक्षण द्या आणि विषय संपवा: मनोज जरांगे
By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2024 06:00 PM2024-09-11T18:00:44+5:302024-09-11T18:01:01+5:30
मराठा पोरांचे तुम्ही वाटोळं करत आहात, मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप
- पवन पवार
वडीगोद्री (जालना) : मी गोरगरिबांची लढाई लढत आहे. तुम्हाला का वाटते गरिबांचे पोरं मोठे होऊ नये, असा सवाल मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे यांनी सरकारला केला. मराठा समाजाच्या लेकरांना न्याय मिळावा म्हणून मी पुन्हा उपोषण करणार असल्याचा निर्धार जरांगे पाटील यांनी व्यक्त केला. अंतरवाली सराटी येथे आज दुपारी मनोज जरांगे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला.
जरांगे पुढे म्हणाले, १७ सप्टेंबरपासून माझे उपोषण पुन्हा एकदा सुरू होणार आहे, आपल्या ८ ते ९ मागण्यासाठी हे उपोषण करतोय, मी काही वाईट करत नाही, असे जरांगेंनी म्हटले आहे. ''तुम्ही आरक्षण दिले नाही तर तुम्हाला आमचा कचका कळेल, देवेंद्र फडणवीसांनी ट्रॅप रचला आहे'', असा आरोपही जरांगे यांनी यावेळी केला. फडणवीसांनी काही तज्ञ, काही संघटना, काही अभ्यासक, आमदार, समन्वयक, फोडले आहेत. त्यांच्या सांगण्यावरून काही आमदार जातीमध्ये फुट पाडत आहेत. ही मस्ती जिरवणार, असा इशारा जरांगे यांनी दिला आहे.
आरक्षण मिळण्याच्या आधी ईडब्ल्यूएसमधून मराठा पोरांनी अर्ज दाखल केले. आधी मान्य केलेल ते अर्ज आता रद्द केले आहेत. या पोरांचे तुम्ही वाटोळं करत आहात. फडणवीस तुम्ही मराठ्यांचे पोरं का मारायला लागलात, का त्यांना अडचणीत आणत आहात, असा सवाल जरांगे यांनी फडणवीस यांना केला.