आत्मकल्याणासाठी गणेशलालजींचे समताधिष्ठित तत्त्वज्ञान स्वीकारावे- विवेकमुनीजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2020 01:03 AM2020-01-24T01:03:56+5:302020-01-24T01:04:21+5:30
प. पू. गणेशलालजी म. सा. यांनी घालून दिलेले समतेचे सूत्र आपण पाळले पाहिजे, असा हितोपदेश प.पू. विवेकमुनीजी म.सा. यांनी दिला.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : प. पू. गणेशलालजी म. सा. यांचे समताधिष्ठीत सूत्र प्रत्येकाने अंगीकारले तर दु:खाचे निश्चितच हरण झाल्याशिवाय राहणार नाही. त्यांच्याबद्दल सांगावे तितके कमी असले तरीही त्यांनी घालून दिलेले समतेचे सूत्र आपण पाळले पाहिजे, असा हितोपदेश प.पू. विवेकमुनीजी म.सा. यांनी येथे बोलताना दिला.
प. पू. गणेशलालजी म. सा. ५८ व्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित गुरु गणेश या विषयावरील विशेष प्रवचनात प.पू. विवेकमुनी बोलत होते. यावेळी प.पू. श्रुतमुनिजी म.सा., मौन साधक प.पू. सौरभमुनीजी म. सा. युवा प्रेरक प.पू. गौरवमुनीजी म.सा., तप रत्नाकर प.पू. अक्षरमुनीजी म.सा., प.पू. प्रणवमुनीजी म.सा., प.पू.श्री दिलीपकंवरजी म.सा., प.पू.नमिताजी म. सा; प.पू. सुशिलकंवरजी म.सा आदींची उपस्थिती होती.
पुढे बोलताना प. पू. विवेकमुनीजींनी समता शब्दाचा अर्थ विस्ताराने सांगितला. ते म्हणाले की, स म्हणजेच सावधान, आपल्या प्रत्येकालाच सावधान होण्याची नितांत गरज आहे. आपण जर सावधानतेचे तत्व अंगिकारले नाही तर काहीही होऊ शकते.
परंतू सुखकर आणि चारित्र्य संपन्न जीवनासाठी आपल्याला सावधान होऊन जगण्याची गरज आहे. म म्हणजे गुरु की बात मानो. गुरु जे-जे सांगतील ते-ते आपण ऐकले पाहिजे. कारण गुरु कधीही वाईट सांगत नाहीत. त्यांची प्रत्येक गोष्ट ही आपल्या हिताची असते आणि त्यातच आपले कल्याण दडलेले आहे. म्हणूनच गुरु सांगतील ते ऐकले पाहिजे.
त म्हणजे मनुष्याने भक्तीत तल्लीन झाले पाहिजे. आपण भक्ती करतो परंतू त्यात मन लावत नाहीत.
म्हणून आपली भक्ती पावन होत नाही, ती लोप पावली जाते. म्हणूनच आपण प्रत्येकाने प. पू. गुरु गणेशलालजी म. सा. यांच्या समताधिष्ठित त्रिसूत्रीचा अंगीकार करुन मार्गक्रमण केले पाहिजे, असे सांगून प. पू. विवेकमुनीजींनी गुरु गणेशलालजी यांच्या अनेक गौरवशाली कार्याचा आपल्या प्रवचनात उल्लेख करुन पुण्यतिथी समारोहातील कार्यक्रमात सहभागी होतांनाच उणिवांवर बोट ठेवण्याऐवजी सहकार्य करण्याचे आवाहनही केले.
यावेळी समाजातील श्रावक, श्राविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. शुक्रवारी पुण्यतिथी निमित्त विशेष कार्यक्रम होणार आहे.
प. पू. गणेशलालजी म. सा. यांच्या पुण्यतिथीनिमित्त तपोभूमीत देशभरातून मोठ्या संख्येने भक्तगण आलेले असून त्यांच्या सुरक्षेसाठी जैन श्रावक संघाच्यावतीने ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे, खासगी सुरक्षा रक्षकांबरोबरच पोलिसांची मोठी कुमक तैनात केली आहे. संघाच्यावतीने सुरक्षेची व्यापक प्रमाणात काळजी घेण्यात आली असतांनाच स्वयंसेवक आणि संघाचे पदाधिकारीही देखरेख करत आहेत.
आज मुख्य समारोह
प. पू. गणेशलालजी म. सा. यांच्या पुण्यतिथीचा शुक्रवारी मुख्य समारोह होत असून यानिमित्त साधन के स्त्रोत- गुरु गणेश या विषयावरील विशेष प्रवचनासह विविध कार्यक्रम होणार आहेत.