२३ डिसेंबर रोजी बीडच्या सभेत मराठा आरक्षण आंदोलनाची पुढील दिशा जाहीर करू- मनोज जरांगे
By विजय मुंडे | Published: December 17, 2023 03:00 PM2023-12-17T15:00:00+5:302023-12-17T15:00:14+5:30
आता उपोषण नको, थेट भूमिका घ्या, मराठा समाजाची भूमिका
जालना: मराठा आरक्षण आणि समाजाला दिलेल्या आश्वासनांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोमवारी विधीमंडळात भूमिका जाहीर करणार आहेत. त्यामुळे शासनाला आपली पुढील भूमिका समजू नये, यासाठी २३ डिसेंबर रोजी बीडमध्ये होणाऱ्या सभेत मराठा आरक्षण आंदोलनाची पुढील दिशा जाहीर करू, अशी भूमिका मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी मांडली. याचवेळी २४ डिसेंबर नंतर उपोषण नको, भेट भूमिका घ्या, अशी आग्रही मागणी करीत मराठा समाज बांधवांनी मुंबई, मुंबई अशा घोषणा दिल्या. त्यावेळी मनोज जरांगे पाटील यांनीही समाज बांधवांच्या मागणीनुसार भूमिका जाहीर करू, असे आश्वासन दिले.
अंतरवाली सराटी (ता.अंबड) येथे मराठा आरक्षण आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यासाठी रविवारी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. आजवर मराठा आरक्षणासाठी झालेल्या आंदाेनाची माहिती देत विविध विषयांवर जरांगे पाटील यांनी माहिती दिली. महाराष्ट्रातील सरसकट मराठा समाजाला ओबीसीतून कुणबी प्रमाणपत्र देवून आरक्षण देण्यासाठी शासनाला दिलेली २४ डिसेंबर हीच डेडलाईन आहे. त्यात आता बदल होणार नाही. आजवर ५४ लाख नोंदी सापडल्या आहेत. त्यानुसार संबंधितांना कुणबी प्रमाणपत्राचे वाटप सुरू करावे, सापडलेल्या नोंदींना कोठेही चॅलेंज होणार नाही.
त्यामुळे त्या नोंदीचा आधार घेवून शासनाने मराठा समाजाचा ओबीसीत समावेश करावा, कोपर्डी प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, नोकरभरतीसाठी पात्र असलेल्या १३ हजार मराठा युवकांना नियुक्त्या द्याव्यात, आरक्षण मिळेपर्यंत नोकरभरती करू नये आणि केलीच तर मराठा समाजाच्या जागा राखीव ठेवून करावी, सर्व देवस्थानाकडील नोंदी, राजस्थानातील भाट लोकांकडील नोंदी, देवीच्या लस दिल्यानंतर घेतलेल्या नोंदी, टीसीवरील नोंदी शासकीय अभिलेखे म्हणून त्याची नोंद घ्यावी, आई ओबीसी- वडील मराठा असतील तर पोराला दोघांच्या जाती लावाव्यात यासह इतर मागण्या मनोज जरांगे पाटील यांनी केल्या. मराठा आरक्षणाची लढाई विचाराने, ताकदीने आणि युक्तीने लढायची आहे. कोणीही उद्रेक करू नका, शांततेत मोठी ताकद आहे. आरक्षण मिळेपर्यंत आंदोलन मागे घेतले जाणार नाही, अशी भूमिकाही मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केली. यावेळी राज्यातील मराठा समाज बांधव उपस्थित होते.
मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेकडे लक्ष
मंत्री उदय सामंत यांनी रविवारी सकाळी मोबाईलवर संवाद साधून शासन दिलेल्या आश्वासनांवर ठाम असल्याचे सांगितल्याची माहिती मनोज जरांगे पाटील यांनी दिली. विधीमंडळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मराठा आरक्षणाची भूमिका सोमवारी मांडणार आहेत. त्यामुळे आपण आपल्या पुढील आंदोलनाची दिशा आज जाहीर करायची नाही. गनीमिकाव्याने लढायचे, असे सांगितले. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विधीमंडळात सोमवारी कोणती भूमिका मांडणार याकडे मराठा समाजाचे लक्ष लागले आहे.