आरोग्य सेवा सुधारण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार- टोपे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2020 12:25 AM2020-02-16T00:25:09+5:302020-02-16T00:25:25+5:30
आरोग्य सेवेचा चेहरा आपल्याला बदलायचा आहे. यासाठी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी चांगले काम करावे, अशी सूचना आरोग्यमंत्री तथा पालकमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : जालना जिल्ह्यातील आरोग्य सेवा सुधारण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करणार आहोत. येणाऱ्या काळात आरोग्याचे प्रश्न सोडवून आरोग्य सेवेचा चेहरा आपल्याला बदलायचा आहे. यासाठी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी चांगले काम करावे, अशी सूचना आरोग्यमंत्री तथा पालकमंत्री राजेश टोपे यांनी उपस्थित अधिकारी व कर्मचारी दिली.
जालना जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात शनिवारी शिक्षण व आरोग्य विभागाची आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते. या बैठकीला जि. प. अध्यक्ष उत्तम वानखेडे, उपाध्यक्ष महेंद्र पवार, सर्व सभापती, मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा यांच्यासह सर्व सदस्य, आरोग्य व शिक्षण विभागातील अधिकारी व कर्मचा-यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
बैठकीच्या सुरुवातीलाच आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर बैठकीला सुरूवात झाली. जिल्हा आरोग्य अधिकारी विवेक खतगावकर यांनी आरोग्य विभागाने केलेल्या कामकाजाचा लेखाजोखा सांगितला. आरोग्यमंत्री टोपे यांनी सांगितले की, जिल्ह्यातील आरोग्य केंद्रांची परिस्थिती बिकट आहे. आरोग्य केंद्र व उपआरोग्य केंद्रांच्या इमारती मोडकळीस आल्या आहे. तसेच आरोग्य केंद्रातील साहित्य धूळ खात पडलेले आहे. जिल्हाभरात आरोग्य सेविका, सेवक व डॉक्टरांची पदे रिक्त आहेत. हे सर्व प्रश्न आपल्याला तातडीने सोडायचे असून, या कामांसाठी आपण निधी कमी पडू देणार नाही.
जिल्ह्यातील आरोग्य सेवेचा चेहरा बदलायचा असेल तर अधिका-यांसह झेडपी सदस्यांनीही आरोग्य सेवा सुधारण्याकडे लक्ष दिले पाहिजे. लवकरच राज्यभरातील रिक्त असलेली ४० ते ४५ हजार डॉक्टरांची पदे भरण्यात येणार आहे. त्यामुळे रिक्त पदांचाही प्रश्न सुटणार आहे.
आपल्याला पहिल्यांदा जालना जिल्ह्यातील आरोग्य सेवेचा चेहरामोहरा बदलायचा आहे.
त्यामुळे लागेल तेवढा निधी आपण द्याला तयार असल्याचेही त्यांनी सांगितले.
या बैठकीला जिल्हा आरोग्य अधिकारी, शिक्षणाधिकारी यांच्यासह तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी आदींची उपस्थिती होती.
पिंपरखेडा बु. येथील आरोग्य केंद्राला मंजुरी
जालना जिल्ह्यात ४० आरोग्य केंदे्र कार्यरत आहेत. ३ आरोग्य केंद्रांना मान्यता मिळाली आहे तर पिंपरखेडा येथील आरोग्य केंद्राला दोन दिवसांपूर्वीच मान्यता देण्यात आली आहे. जिरडगाव येथील आरोग्य केंद्राचे काम तातडीने पूर्ण करण्याच्या सूचनाही त्यांनी आरोग्य अधिका-यांना दिल्या.
आरोग्य केंद्रांकडे लक्ष द्या
जालना जिल्ह्यातील आरोग्य केंद्रांची स्थिती फार चांगली नाही. त्यामुळे आरोग्य केंद्रांचा चेहरामोहरा बदलण्याची गरज आहे. आरोग्य केंद्रात आधुनिक उपकरणांचा वापर करा. आरोग्य केंद्राबाहेर झाडे लावून त्याची निगा राखा, निधीची गरज भासल्यास मी तुम्हाला निधी देतो. आरोग्य सेवेचे काम जालन्यातूनच होईल, असेही आरोग्यमंत्री टोपे यांनी सांगितले.
तालुकास्तरावर सर्व सुविधा असणारे रूग्णालय उभारणार
तालुकास्तरावरच सर्व सुविधा असणारे रूग्णालय उभारण्यात येणार आहे. जालना जिल्ह्यातील आठही तालुक्यात हे रूग्णालय उभारण्यात येणार असून, यासाठी लवकरच काम करण्यात येणार आहे. तसेच मेन्टल आणि आयुष्य हे दोन्ही दवाखाने सुरू करण्यासाठी प्रस्ताव पाठविण्यात आला असल्याचेही त्यांनी सांगितले.