विमा कंपन्यांना वठणीवर आणणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2019 12:18 AM2019-06-23T00:18:45+5:302019-06-23T00:19:13+5:30
पीकविमा कंपन्या आणि बँकांना वठणीवर आणण्याचे काम शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली करणार आहोत, असे प्रतिपादन पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : शिवसेना सदैव शेतकऱ्यांच्या पाठीशी उभी राहिली आहे. सत्तेत असतानाही शिवसेना कर्जमाफीसाठी रस्त्यावर उतरली होती. त्यामुळे आता पीकविमा कंपन्या आणि बँकांना वठणीवर आणण्याचे काम शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली करणार आहोत, असे प्रतिपादन पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी केले. शनिवारी जालना येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
येथील जालना जिल्हा शिवेसेनेच्या वतीने पीकविमा संदर्भात शेतकऱ्यांकडून तक्रार अर्ज भरून घेतले जात आहेत. जालना जिल्ह्यातील आठही तालुक्यांमध्ये हे केंद्र सुरू करण्यात येणार आहेत. जालना येथील तक्रार निवारण केंद्राला रामदास कदम यांनी शनिवारी सकाळी भेट देऊन शेतक-यांशी संवाद साधला.
यावेळी ते म्हणाले, एकीकडे शेतकरी आत्महत्या करत आहेत. या रोखल्या गेल्या पाहिजेत. त्यामुळे पीकविमा कंपन्यांनी हातचलाखी न करता पीकविम्याचे वाटप करावे. आगामी काळात बँका आणि पीकविमा कंपन्यांनी शेतक-यांचे हित न जोपासल्यास त्यांना धडा शिकविला जाईल. महाराष्ट्रात २४ हजार कोटी रूपयांची कर्जमाफी देण्यात आली आहे. परंतु, काही बँकांनी कर्जमाफीची रक्कम शेतक-यांच्या खात्यात जमा करत नसल्याचे कदम यांनी सांगितले.
यावेळी प्लास्टिक बंदीबद्दल कदम म्हणाले, प्लास्टिकपासून होणा-या कच-याचे प्रमाण ५० टक्के घटले आहे. आगामी काळात आणखी कठोर निर्णय याविषयी घेणार आहोत. दूध पॅकिंगसाठी महाराष्ट्रात दररोज एक कोटी प्लास्टिकच्या पिशव्या लागतात. याबद्दलही लवकरच धोरणात्मक निर्णय घेतला जाईल, असेही कदम यांनी सांगितले. या कार्यक्रमास राज्यमंत्री अर्जुन खोतकर, जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरूद्ध खोतकर, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख भास्कर अंबेकर यांच्यासह शेतक-यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हरिहर शिंदे यांनी केले.
यावेळी उपस्थित शेतक-यांनी आपल्या व्यथा रामदास कदम यांच्यासमोर मांडल्या. तसेच त्यांना निवेदनही सादर केले. शिवसेनेकडून न्याय मिळेल, अशी आशा व्यक्त केली.
सव्वा लाख शेतकरी वंचित
जालना जिल्ह्यातील जवळपास सव्वा लाख शेतकरी अद्यापही विम्यापासून दूर असल्याची माहिती अंबेकर यांनी दिली. तसेच राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी विमा कंपन्या आणि कृषी तसेच महसूल खात्याची मिलीभगत असून, पीक कामपणी प्रयोगाबद्दलही खोतकरांनी शंका उपस्थित केली. असा मुद्दा मंत्री कदम यांनी देखील उपस्थित केला. यावेळी शेतक-यांनी कदम यांना मागण्याचे निवेदन सादर केले. तसेच जास्तीत जास्त शेतक-यांनी अर्ज भरून देण्याचे आवाहन रामदास कदम यांनी यावेळी केले.