खड्ड्यांसोबत सेल्फी काय घेता? विकासकामांचे बोला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2017 01:04 AM2017-12-24T01:04:43+5:302017-12-24T01:04:54+5:30
राष्ट्रवादीचे नेते फेसबुकवर खड्ड्यांसोबत सेल्फी काढून विकासकामांबद्दल प्रश्न विचारत आहेत. राष्ट्रवादीच्या नेत्यांनो, फेसबुक सोडून प्रत्यक्षात समोरासमोर या आणि जाहीर चर्चा करा, असे आव्हान भाजप प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांनी शनिवारी येथे दिले.
लोकमत न्यूज नेटवर्क
अंबड : राष्ट्रवादीचे नेते फेसबुकवर खड्ड्यांसोबत सेल्फी काढून विकासकामांबद्दल प्रश्न विचारत आहेत. राष्ट्रवादीच्या नेत्यांनो, फेसबुक सोडून प्रत्यक्षात समोरासमोर या आणि जाहीर चर्चा करा, असे आव्हान भाजप प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांनी शनिवारी येथे दिले.
जालना-वडीगोद्री मार्गाच्या काँक्रिटीकरणासाठी ३३७ कोटींचा निधी मंजूर करवून आणल्याबद्दल खा. दानवे यांचा अंबड तालुका व्यापारी महासंघाच्या वतीने पं. गोविंदराव जळगावकर नाट्यगृहात सत्कार करण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते.
खा. दानवे म्हणाले की, तुमच्या पंधरा वर्षांच्या सत्ताकाळात तुम्ही जिल्ह्यात कोणती विकासकामे केली, किती निधी आणला ते सांगावे. आमच्या केवळ तीन वर्षांत विकासकामांसाठी किती निधी आणला ते सांगतो. जिल्ह्यात तब्बल सहा हजार कोटींची केवळ रस्त्यांची कामे सुरु आहेत. एक हजार कोटी रुपयांच्या ड्रायपोर्टचे काम सुरु आहे. आयसीटी कॉलेज मंजूर केले, त्यासाठी २०० एकर जागा उपलब्ध करुन दिली. सीड्स पार्कचे काम सुरु आहे. जालना शहरात ६० कोटी रुपयांची रस्त्यांची कामे केली आहेत, अशी अनेक विकासकामे सांगता येतील.
सगळे मिळून माझा पराभव करु, असे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही भ्रमात आहात. आता तुमची मला रोखण्याची काय बिशाद आहे? अशा शब्दात खा. दानवे यांनी मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेसह विरोधकांना आव्हान दिले.
आ. नारायण कुचे म्हणाले की, अंबड शहराचा जालना-जायकवाडी पाणीपुरवठा योजनेत समावेश करण्याचे काम आम्ही केले. मात्र श्रेय लाटण्यासाठी आ. राजेश टोपे यांनी केविलवाणा प्रयत्न केला. शहरातील पाचोड नाका येथे नियोजित छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौकाच्या सुशोभीकरणासाठी १६ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करण्यात आला असून त्याचे कंत्राट निघाल्याची घोषणा त्यांनी केली. यावेळी नगराध्यक्षा संगीता कुचे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष रामेश्वर भांदरगे, देविदास कुचे, साहेबराव खरात, दीपकसिंग ठाकूर, गंगासागर पिंगळे, अंबादास अंभोरे, चंद्रप्रकाश सोडाणी, अरुण उपाध्ये, संदीप काबरा, संतोष सोमाणी, किरण खरात, विश्वजित खरात, शहराध्यक्ष संदीप खरात, गंगाधर वराडे, सौरभ कुलकर्णी, राहुल खरात, फिरोज अध्यक्ष, विष्णू पुंड, अशोक लांडे, नारायण खले, ओमप्रकाश उबाळे, रमेश शहाणे, सुनील खानचंदानी, युसूफ मणियार, नसीर बागवान, अय्युब बागवान, राजेंद्र डहाळे, सुहास सोडाणी, अॅड. लक्ष्मण गायके, प्रसाद झाडे, अॅड. आशा गाडेकर, इंदुमती घुगे, शिवाजी बजाज, नीलेश लोहिया, ओमसेठ जाजू आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन शेखर मोहरीर यांनी केले.
रावसाहेब दानवेच्या नादी लागणे एवढे सोपे नाही, ही तर सुरुवात आहे. पुढे बघा, तुम्हाला कशी पळता भुई थोडी करतो असे आव्हान खा.दानवे यांनी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांचे नाव न घेता दिले.