रात्री जरांगे पाटलांना दिलेल्या चिठ्ठीत नेमकं काय? रावसाहेब दानवेंची दिलं स्पष्टीकरण
By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2023 12:09 PM2023-09-14T12:09:09+5:302023-09-14T12:10:29+5:30
रावसाहेब दानवे यांनी जरांगे पाटील यांची भेट घेत त्यांच्याशी मराठा आरक्षणावर सविस्तर चर्चा केली
मुंबई - मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालना येथील अंतरवाली सराटी गावात मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सुरू केले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आश्वासनानंतर अखेर १७ व्या दिवशी जरांगे पाटील यांनी आपलं उपोषण मागे घेतलं. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह गिरीश महाजन, राधाकृष्ण विखे पाटील, संदीपान भुमरे, राजेश टोपे, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, अर्जुन खोतकर यांचीदेखील उपस्थिती होती. शिंदे यांच्या हस्ते ज्यूस घेऊन जरांगे यांनी आपले उपोषण मागे घेतले. तत्पूर्वी बुधवारी रात्री उशिरा रावसाहेब दानवे यांनी जरांगे पाटील यांची भेट घेतली होती. त्यावेळी, एक चिठ्ठीही त्यांच्याहाती दिली होती. त्यामुळे, आता उपोषण मागे घेणार असल्याची चर्चा रंगली होती.
रावसाहेब दानवे यांनी जरांगे पाटील यांची भेट घेत त्यांच्याशी मराठा आरक्षणावर सविस्तर चर्चा केली. पाटील यांच्या उपोषणाला महाराष्ट्रातून मोठा प्रतिसाद मिळाला असून लाखो लोकं त्यांच्या भेटीसाठी अंतरवाली सराटी गावात आल्याचं आपण पाहिलं. या उपोषणामुळेच सरकारचं लक्ष मराठा समाजाच्या आरक्षणाकडे वेधलं गेलं. आता आमची मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत सकारात्मक चर्चा झाली आहे. या चर्चेचा तपशील आम्ही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना देणार आहोत. त्यानंतर, मुख्यमंत्री इकडे यायचं, कधी यायंच ते ठरवतील. त्यानंतर, उपोषण सोडायचं की नाही सोडायचं हा अधिकार सर्वस्वी मनोज जरांगे पाटील यांचा आहे. त्यामुळे, उपोषण सोडण्यासंदर्भात तेच तुम्हाला सांगतिल, असे केंद्रीय मंत्री आणि जालन्यातील नेते मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं.
जरांगे पाटलांना दिली चिठ्ठी
रावसाहेब दानवे यांनी बुधवारी रात्री उशिरा मनोज जरांगे पाटील यांची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी, त्यांना एक चिठ्ठीही दिली, त्याबद्दल दानवेंना पत्रकारांनी प्रश्न विचारला होता. त्यावर, मनोज जरांगे पाटील यांनी मला फोन नंबर लिहून दिले, माझ्याकडे एकही फोन नंबर नव्हता. मी ते फोन नंबर लिहून घेतले, अशी माहिती रावसाहेब दानवे यांनी चिठ्ठीबाबत दिली.
दरम्यान, मी उपोषणस्थळी दिल्लीहून आलो, गिरीश महाजन हे मुंबईतून आले. त्यामुळे, कुठलंही शेड्युल ठरलेलं नव्हतं, अचानक हा भेटीचा दौरा करण्यात आल्याचं दानवे पाटील यांनी सांगितलं.
आरक्षण मिळवून देईपर्यंत स्वस्थ बसणार नाही - शिंदे
"मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही" असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. तसेच मनोजला भेटायचं हे मी ठरवलं होतं. आपली भूमिका मी अगदी स्पष्टपणे मांडली आहे, उपोषण सोडलं त्याबद्दल आभारी आहे, असंही शिंदेंनी सांगितलं. "तुमचा मुलगा भारी आहे, स्वत: साठी नाही तर समाजासाठी लढतोय हे मी मनोजच्या वडिलांना सांगितलं. जेव्हा जेव्हा मला मनोज भेटला तेव्हा त्याने मराठा आरक्षणाबद्दलच चर्चा केली. मनोजला मनापासून शुभेच्छा आणि त्याचं मनापासून अभिनंदन करतो, आंदोलन करणं, आमरण उपोषण करणं ते जिद्दीने पुढे नेणं आणि त्याला महाराष्ट्रात जनतेचा प्रतिसाद मिळतो हे फार कमी वेळी पाहायला मिळतं. ज्याचा हेतू शुद्ध असतो त्याच्यामागे जनता पाहायला मिळते."