दगडाला शेंदूर लावून हा कुठला तुमचा देव झाला? छगन भुजबळ यांची जरांगेंवर घणाघाती टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2023 02:42 PM2023-11-17T14:42:36+5:302023-11-17T14:43:48+5:30
आमच्या हक्काचे खातो म्हणतोय, अरे तुझे खातो का?
जालना: आता मराठा समाजाचा नवा नेता निर्माण झाला आहे. धनगर, तेली, माळी यांना नंतर ओबीसीमध्ये घुसवले असे तो म्हणतोय. पण आरक्षण म्हणजे काय ते तर समजून घ्या. आरक्षण हा गरीबी हटाव कार्यक्रम नाही. आम्हाला घटनेने, संविधानाने, बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षण दिले आहे. आमच्या हक्काचे खातो म्हणतोय, अरे तुझे खातो का? आम्ही सासऱ्याच्या घरी तुकडे मोडत नाहीत, दगडाला शेंदरू लावून हा कुठला तुमचा देव झाला? अशी घणाघाती टीका मनोज जरांगे यांचे नाव न घेता ओबीसी नेते, मंत्री छगन भुजबळ यांनी केली.ते जालना येथील ओबीसी एल्गार सभेत बोलत होते.
पुढे बोलताना भुजबळ म्हणाले, मंडल आयोगाने देशभर फिरून ओबीसी यांची संख्या ५४ टक्के असल्याने त्यांना २७ टक्के आरक्षणाची शिफारस करण्यात आली. तो आयोग तत्कालीन प्रधानमंत्री व्ही. पी. सिंग यांनी स्वीकारला. त्याची अंमलबाजवणी शरद पवार यांनी मुख्यमंत्री असताना केली. त्यांच्या हातात कोणाला आरक्षण देयचे नव्हते, यामुळे त्यांनी कोणाला आरक्षणापासून वंचित ठेवले, असा होत नसल्याचा खुलासा मंत्री भुजबळ यांनी आज केला.
मराठा आरक्षणाला आमचा विरोध नाही. मराठा मोर्चे निघाले, मराठा समाजाला हजारो कोटी मिळत आहेत. अनेक तरतुदी आहेत. पण ओबीसी महामंडळाला हजार कोटी देखील मिळाले नाहीत. मराठा आंदोलना दरम्यान, ७० पोलिस जखमी झाले, ते काय पाय घसरून पडले का? त्यांच्यावर हल्ला झाला त्यांनी काय करायचे, असा सवाल देखील भुजबळ यांनी केला. खरे चित्र राज्या पुढे आले नाही. त्यानंतर आमदार सोळंकें, क्षीरसागर यांच्या घरांवर हल्ले झाले. बीडपासून दूर सुभाष राऊत यांचे हॉटेल फोडले. हे सर्व पूर्वनियोजित होते, प्रत्येक ठिकाणास नंबर दिले होते. पेट्रोल बॉम्ब टाकण्यात आल.,असेही भुजबळ म्हणाले.