कितीही देव पाण्यात ठेवा, सरकार पाच वर्षे टिकणार- राजेश टोपे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2020 01:10 AM2020-02-04T01:10:22+5:302020-02-04T01:11:08+5:30
कोणी कितीही देव पाण्यात ठेवले तरी आमचे महाआघाडीचे सरकार पाच टिकणार असल्याचा विश्वास राज्याचे आरोग्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
परतूर : कोणी कितीही देव पाण्यात ठेवले तरी आमचे महाआघाडीचे सरकार पाच टिकणार असल्याचा विश्वास राज्याचे आरोग्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केला. जिल्ह्यातील आरोग्य विभागासह इतर प्रश्न सोडवून विकास कामांना प्राधान्य देणार असल्याची ग्वाहीही राजेश टोपे यांनी यावेळी दिली.
राष्ट्रवादी युवक काँगे्रसचे जिल्हाध्यक्ष कपिल आकात यांनी सोमवारी परतूर येथे पालकमंत्री राजेश टोपे यांच्या नागरी सत्काराचे आयोजन केले होते. सत्काराला उत्तर देताना टोपे बोलत होते. कार्यक्रमास राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शेख महेबूब, माजी आ. सुरेशकुमार जेथलिया, भाऊसाहेब गोरे, गोपाळराव बोराडे, बळीराम कडपे, मनोज मरकड, संभाजी देशमुख, अन्वर देशमुख, कुणाल आकात आदींची प्रमुख उपस्थिती होती.
पुढे बोलताना पालकमंत्री राजेश टोपे म्हणाले, लोकांच्या मदतीशिवाय काही होऊ शकत नाही. लोकांचीच इच्छा भाजपाला बाजूला ठेवायची होती. त्या विचारातून आमचे महाआघाडीचे सरकार निर्माण झाले आहे. हे सरकार पाच वर्षे टिकणार आहे. कारण यामागे जबाबदारी बरोबरच प्रेम व विश्वास आहे. आमचे सरकार लोकहिताचे आहे. सामान्य माणूस, शेतकरी, कष्टकरी यांना केंद्र माणून विकासाच्या योजना आम्ही आखणार आहोत. दोन लाखांपर्यंतचे शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले असून, त्यावरील कर्जही माफ करण्यासाठी उपसमिती नियुक्त केली आहे. मात्र दोन लाखाच्या वरची रक्कम शेतकऱ्यांना भरावी लागणार आहे.
जिल्ह्यातील आरोग्य केंद्राचे प्रश्न तातडीने मार्गी लावण्यात येतील. शासकीय रूग्णालय ही गरिबांचा आधार आहेत. ती समृध्द करण्याकडे आमचा कल राहणार आहे. आम्ही पाच वर्षात विकासाला गती देण्याचे काम करू. माझ्यावर टाकलेली जबाबदारी मी काटेकोरपणे जनतेची कामे करून विश्वासाने पूर्ण करेन, असेही टोपे यावेळी म्हणाले.
यावेळी महेबूब शेख म्हणाले, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या कामाकडे पाहून आता युवकांचे वय किती असावे, असा प्रश्न पडला आहे. त्यांच्याकडे पाहून युवकांना प्रेरणा मिळते. निवडणुकीच्या काळात काही नवीन पहेलवान आले होते. शरद पवार यांनी त्यांना त्यांची जागा दाखवल्याचे सांगत युवकांनी संघटित होऊन पक्षाचे कार्य करावे, असे आवाहनही शेख यांनी केले. यावेळी माजी आ. सुरेशकुमार जेथलिया, गोपाळराव बोराडे, भाऊसाहेब गोरे यांनीही मनोगत व्यक्त केले. सत्कार कार्यक्रमानिमित्त शहरातून दुचाकी रॅली काढण्यात आली. कार्यक्रमास जगन्नाथ काकडे, आसाराम लाटे, ओंकार काटे, अखिल पठाण, योगेश बरकुले, बंडूअप्पा मुळे, प्रभाकर धुमाळ आदींची उपस्थिती होती.